पुणे -करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आता डोस आले तरी सद्यस्थितीत लाभार्थी मिळणे कठीण होणार आहे. याचे कारण म्हणजे सर्वात मोठा वर्ग असलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण बंद आहे आणि दुसऱ्या डोसवाल्यांचा तो घेण्याचा कालावधी लांबला आहे. त्यामुळे आता लसीकरण केंद्रांवरची गर्दी बंद होऊन लाभार्थींची वाट पहावी लागणार आहे. लाभार्थ्यांनाही तीन ते चार महिने दुसऱ्या डोसची वाट पहावी लागणार आहे.
नव्या नियमाचा परिणाम
राज्य सरकारने 18 ते 44 वर्षे वयोगटासाठीच्या नागरिकांचे लसीकरण तात्पुरते बंद केले आहे. तसेच 45 वर्षे वयापुढील “कोविशील्ड’चा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता दुसरा डोस चार महिन्यांनीच मिळणार आहे. त्या संबंधीचा अध्यादेश महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे लसींचे डोस महापालिकेला मिळाले तरी आता त्यांना ते देताना पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील अंतर पहावेच लागणार आहे.
त्याशिवाय दुसरा डोस मिळणारच नाही.सद्यस्थितीत “कोविशील्ड’चा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या सहा लाख असून, ‘कोवॅक्सिन’ चा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या सुमारे 66 हजार आहे. “कोवॅक्सीन’ मात्र 28 दिवसानंतरच द्यायची असल्याने त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र “कोविशील्ड’ मध्ये दोनवेळा बदल करण्यात आला आहे.
6 लाख नागरिक प्रतीक्षेत
“कोविशील्ड’ ही या आधी 28 दिवसांनी घ्यायची असा नियम सुरूवातीला होता. त्यानंतर तो सहा ते आठ आठवडे म्हणजे 42 ते 56 दिवस केला. मात्र आता पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस 12 ते 16 आठवडे म्हणजे तीन ते चार महिन्यांनी घ्यायचे आहे. आता पुण्यामध्ये पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेणे शिल्लक असणारे सहा लाख लोक आहेत. मात्र त्यांना आता वेळेच बंधन राहणार आहे.