पुणे, दि. 18 -गेल्या आठवड्यात शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्या साडेबारा लाखांच्या पुढे गेल्याचे दिसून येत आहे. पीएमपीकडे दाखल झालेल्या सर्व ई-बस मार्गावर आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरात पीएमपी ही महत्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. साधारणतः 1600 ते 1650 बस मार्गावर धावत होत्या. त्यामधून दिवसाला 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. पण, पीएमपीकडून जास्तीत जास्त बस मार्गावर आणून प्रवाशांना सेवा देण्याच्या सूचना पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबरोबरच कोणत्या मार्गावर गर्दी असते, याचा देखील पीएमपीने अभ्यास सुरू केला आहे. जास्तीत जास्त बस मार्गावर आणण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यापासून पीएमपीच्या दररोज 1700 ते 1750 बस मार्गावर धावत आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या देखील साडेबारा लाखांपर्यंत वाढली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे.
पीएमपीच्या ताफ्यात आतापर्यंत 458 ई-बस दाखल झाल्या आहेत. त्यानुसार भेकराईनगर, डेक्कन, निगडी, वाघोली, बाणेर हे ई-बस डेपो पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. वाघोली येथील ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तेथून 105 बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता 458 ई-बस मार्गावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे एकूण बसची संख्या देखील वाढली आहे.
ठळक मुद्दे…
पूर्वीच्या दैनंदिन बसची संख्या- 1650
पूर्वीची दैनंदिन प्रवासी संख्या- 12 लाख
गेल्या आठवड्यातील बसची संख्या- 1750
गेल्या आठवड्यातील प्रवासी संख्या- 12 लाख 50 हजार