पुणे – छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारकाचा विकास करताना स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या-नव्या पद्धतीचा संगम करीत मजबूत ऐतिहासिक दृश्यस्वरुपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. हुतात्मा राजगुरु यांचे राजगुरूनगर येथील स्मारकही भव्य आणि प्रेरणादायी होईल, यापद्धतीने विकसित करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत स्मारक विकास आरखड्याबाबत माहिती घेतली. छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारकाच्या 269 कोटी 24 लाख रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील विकासासाठी निविदा प्रक्रिया झाली आहे. या आराखड्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सादरीकरणाला जीवंतपणा येणार आहे. स्मारकांच्या उभारणीमध्ये दगडी कातीव, कोरीव बांधकाम आदींचा वापर केल्यास बांधकामाला मजबुती येईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.