Pune: मेट्रोच्या कामासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक या दरम्यान बंद केलेली दुहेरी वाहतूक तब्बल तीन वर्षांनी पूर्ववत करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. एक मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे पिंपरीकडून पुण्यात येणाऱ्यांचा वळसा टळणार आहे.
मेट्रोच्या पिंपरी-स्वारगेट या मार्गिकेच्या कामासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक यादरम्यानच्या वाहतुकीत मार्च २०२१मध्ये बदल करण्यात आला होता. त्यामध्ये बोपोडी चौकातून पुण्याकडे येणारी वाहने डावीकडे वळवून खडकी बाजार, खडकी बाजार बस स्टँड, अष्टविनायक मंदिर, मुळा रस्त्याने जात होती.
तसेच, खडकी बाजारमधील वाहन चालकांना खडकी रेल्वे स्टेशन, बोपोडी चौक व पिंपरीकडे जावयाचे असल्यास त्यांना अष्टविनायक मंदिर चौकातून उजवीकडे वळून सरळ महात्मा गांधी रस्त्याने खडकी रेल्वे स्टेशन येथून इच्छित स्थळी जाता येत होते. तर, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बोपोडी चौक ते संविधान चौक या दरम्यानचा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता संपूर्ण खुला करण्यात आला आहे. यामध्ये रस्त्याचे रुंदीकरणही केले आहे.
रस्ता वाहतूक बदल –
– बोपोडी चौक ते खडकी बाजार रस्ता दुहेरी वाहतूक सुरू होणार.
– बोपोडी चौक ते होळकर चौक दरम्यान एलफिस्टन रस्त्यावर जड वाहनांना बंदी.
– चर्च चौक ते आयुध चौकादरम्यान जनरल थोरात मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू.