पुणे – शहरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता मशिनद्वारे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर पाच परिमंडळांसाठी पाच निविदा काढण्यात आल्या. मात्र, हे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वाढल्याने या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आल्यानंतर कामात सुधारणा करा अन्यथा निविदा रद्द करू, असा थेट इशारा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.
शहातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात आल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने स्वच्छता राखली जात नव्हती. त्यामुळे सार्वजनिक मुतारी, स्वच्छतागृह आणि वस्ती पातळीवरील स्वच्छतागृहांच्या स्वच्छता मशिनद्वारे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासाठी महापालिकेच्या 34 आणि ठेकेदारांच्या 24 जेटिंग मशिनचा वापर केला जात आहे.
यामध्ये दिवसांतून दोन वेळा स्वच्छता करणे ठेकेदारावर बंधनकारक करण्यात आले. मात्र, याकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष केल्याने स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात नव्हती, याबाबत नागरिकांकडून तक्रारी वाढल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी ठेकेदार, परिमंडळाचे उपायुक्त, घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत ठेकेदारांना थेट कारवाईचा इशारा दिला.
या ठिकाणी आहेत स्वच्छतागृह…
परिमंडळ-1 येरवडा-ढोले पाटील रस्ता- नगर रस्ता, परिमंडळ -2 कोथरूड,शिवाजीनगर औंध, परिमंडळ -3 वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी, परिमंडळ -4 वानवडी-हडपसर-कोंढवा, परिमंडळ – 5 बिबवेवाडी-भवानीपेठ- कसाब, विश्रामबाग. या परिमंडळात एकूण स्वच्छता गृह 1288 असून याच्या स्वच्छतेबाबत तक्रारी आल्या आहेत.
“स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी पाच परिमंडळनिहाय निविदा काढलेली आहे. परंतु, ठेकेदाराच्या कामाबद्दल नागरिकांकडून तक्रारी आल्याने पालिकेच्या 15 अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून याच अहवाल दिला, त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या. यासंदर्भात बैठक घेऊन कामात सुधारणा करण्याचे अन्यथा निविदा रद्द करण्याबाबतचा इशारा दिला आहे.” – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
आधी विचार करायचा होता…
आठ तासांत आम्हाला दिलेले काम पूर्ण होऊ शकत नाही, अशी तक्रार ठेकेदारांनी केल्यानंतर याचा विचार निविदा भरताना करायचा होता, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच, महिन्यातून एकदा संपूर्ण स्वच्छता केली जात नाही, जेटिंग मशिनसोबत पाणी कमी असते, नोझल पाइपची लांबी कमी असते, त्यामुळे अर्धवट स्वच्छता होते या त्रुटी लक्षात आणून देत कामात सुधारणा करा, अन्यथा निविदा रद्द केली जाईल, असे ठेकेदारांना सांगण्यात आले.