न्यूयॉर्क : काही वर्षांपूर्वी जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. यावेळी कोरोनाच्या विषाणूचे स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून मानवाच्या शरीरावर आक्रमण करत आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. ‘BA.2.86’ नावाचा हा कोरोना व्हेरिएंट अत्यंत घातक स्वरुपाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या BA.2.86 ची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. तसेच जगात वेगाने वाढणाऱ्या या विषाणूमुळे पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाली आहे. जगभरातील अनेक देशांत BA.2.86 नावाचा कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. इस्रायल, डेन्मार्क, अमेरिका आणि यूके व्यतिरिक्त स्वित्झर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत हा कोरोना विषाणू आढळला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रमुख अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची फारशी प्रकरणं आढळून आली नसली तरी या महिन्यात 19 ऑगस्टला 7 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना त्यावर देखरेख करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या कोरोनाच्या नव्या BA.2.86 व्हेरिएंटची लागण जास्त लोकांना झाली नसली, तरी भविष्यात या विषाणूचा संसर्ग वाढू शकतो.
दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2.86 याला पिरोला म्हणूनही ओळखले जात आहे. हा कोरोना विषाणूचाच नवीन प्रकार आहे. जागतिक जीनोम सिक्वेन्सिंग डेटाबेस तयार करणारी संस्था GISAID नुसार, BA.2.86 मध्ये 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन (Mutation) आहेत, कोविडचा हा प्रकार वेगाने पसरतो. WHO ने देखील याला सर्वाधिक पसरणारा कोरोनाचा प्रकार म्हटले आहे. ओमायक्रॉन, अल्फा आणि डेल्टा अशा कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा BA.2.86 पूर्णपणे वेगळा आहे. कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा BA.2.86 हा विषाणू 30 टक्क्यांहून अधिक वेगाने पसरतो, असे म्हटले जाते. पुढे हा विषाणू किती गंभीर होऊ शकतो आणि त्याचा किती प्रमाणात प्रसार होऊ शकतो, याची माहिती कोणालाही नाही.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2.86 ची लक्षणं
* सर्दी
* डोकेदुखी
* थकवा
* सतत शिंका येणे
* घसा खवखवणे
* खोकला
* वास घेण्याची क्षमता कमी होणे