पुणे – शाळेत अश्लिल कृत्य केल्याप्रकरणात पाचपैकी चार पीडित, मुख्याध्यापक फितूर होऊनही न्यायालयाने कंत्राटी शिक्षकाला ३ वर्षे साधा कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी आदेशात म्हटले आहे.
रामेश्वर विलास राठोड (वय ३५, रा. खराडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यापैकी ७ साक्षीदार फितूर झाले. डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत हडपसर भागातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली. राठोड शाळेत कंत्राटी शिक्षक होता. पीडित सहाव्या वर्गात शिकत होत्या. शाळेत स्नेहसंमेलनासाठी नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने मुलींना मोबाईलवर अश्लील चित्रण दाखविले.
याबाबत कोणला सांगितल्यास घरी येऊन, त्या चित्रणाप्रमाणे अश्लील कृत्य करण्याची धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही बाब मुलींनी अन्य शिक्षकांना सांगितली. त्यांनी याबाबत मुस्कान स्वयंसेवी संस्थेला कळविले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. अॅड. वाडेकर यांनी घेतलेला एक पीडित, तिचे पालक, एक विद्यार्थी, त्याचे पालक आणि दोन स्वयंसेवी आणि तपास अधिकार्याची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. बचाव पक्षाने एक साक्षीदार तपासला. मात्र, तो खोटा ठरला.