पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता थेट नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार रस्त्यावर उतरणार आहेत. दोन्ही आयुक्तांकडून शहरातील वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक आणि ३० अपघात प्रवण क्षेत्रांसह, महापालिकेकडून विकसित करण्यात येत असलेल्या १५ आदर्श रस्त्यांचीही पाहणी करणार आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक झाली. यात दोन्ही प्रशासनांनी एकत्र येऊन ही कोंडी फोडण्याचे निश्चित केले. मनपा पथ विभाग, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी शहरातील वाहतूक समस्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, तसेच पोलिसांंची भूमिका यासाठी किती महत्वाची ठरणार आहे, याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी पोलीस आयुक्तांनी सादरीकरणाला प्रतिसाद त्यात सुचवलेल्या उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना पोलीस अधिकार्यांना दिल्या. या उपाययोजना केल्यानंतर त्याचा अहवालही पुढील बैठकीत सादर करण्यास सांगण्यात आले. यावेळी दोन्ही आयुक्त आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांनी शहरातील वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक आणि ३० अपघातप्रवण क्षेत्रांची संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
“शहरातील वाहतूक समस्येवर चर्चा करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून ही बैठक बोलविण्यात आली होती. यात महापालिकेने आदर्श रस्ते, तसेच मिसिंग लिंकसह, शहरातील कोंडी, अपघातांची ठिकाणे तसेच पालिकेककडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना याची माहिती दिली. त्यानंतर आता पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्त शहरात लवकरच संयुक्त पाहणी करणार आहेत.” – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका