तळेगाव ढमढेरे -स्व. लोकनेते संभाजीराव भुजबळ यांच्या 32व्या स्मृतीदिनानिमित्त ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा, रक्तदान शिबीर, कीर्तन, स्व. संभाजीराव भुजबळ विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन समावेश होता. तालुकास्तरीय कबड्डी सरपंच चषक स्पर्धेत एकूण 23 संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रथम क्रमांक खंडेराय स्पोर्टस क्लब धामारी, दिव्तीय पिंपळसुटी स्पोर्टस क्लब,
तृतीय क्रमांक जय हनुमान स्पोर्टस क्लब कासारी, चतुर्थ क्रमांक रांजणगाव स्पोर्टस क्लब यांनी मिळविला तर आदर्श संघ पुरस्कार सावतामाळी स्पोर्टस क्लब राउतवाडी यांनी पटकाविला.
रक्तदान शिबिरात सुमारे 156 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये विशेष म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. रात्री 7 वाजता हभप संग्रामबापू भंडारे यांचे कीर्तन पार पडले. स्व. समाजभूषण संभाजीअण्णा भुजबळ यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचले.
ग्रामीण भागातील खेळाडू मैदानी खेळात पारंगत व्हावेत म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आज अखंड 32 वर्षे त्यांच्या आवडीचा खेळ कबड्डी, रक्तदान शिबिर, कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
आजवर कधीही कोणाला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही. त्यांच्या कार्याची पावती म्हणून 32 वर्षांनंतर सुद्धा अनंत जनसमुदाय जमत असल्याचे स्व. संभाजीअण्णा भुजबळ मित्र परिवार तळेगाव ढमढेरे, कासारी यांच्या वतीने सांगण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शेत्रातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.