पिंपरी, प्रतिनिधी) – बर्थ डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा…अशा स्वरुपाची डीजेवर वाजणारी कर्णकर्कश गाणी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची झोप उडवत असून त्यांच्या ह्दयाचे ठोकेही वाढवत आहेत. ही परिस्थिती शहरासह उपनगरात, आता गल्ली बोळात दिसू लागली आहे. भर रस्त्यात सार्वजनिक स्वास्थ बिघडवणारे वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेड शहरात फोफावत आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधींसह गल्ली बोळातील भाई चमकोगिरी करत वाढदिवस साजरे करत आहेत.
दिवसभर गाड्यांच्या, विविध कार्यक्रमांच्या, बांधकामांच्या किंवा विविध प्रकारच्या गोंगाटातून रात्री नागरिकांची सुटका झालेली असते. मात्र, रात्री बारानंतर व वाढदिवसाच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत डीजे व फटाक्यांच्या मोठ्या आवाजात वाढदिवस साजरे करण्याची विकृत संस्कृती समाजात वाढत आहे.
ही संस्कृती समाज स्वास्थासाठी हानीकारक असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारा हा त्रास सर्वसामान्य नागरिक निमूटपणे सहन करत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्याचे धाडस कोणीही दाखवत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना एका प्रकारे खतपाणीच मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मोठ्या आवाजात गाणी
रुग्णालयाजवळील परिसर हा सायलेंट झोन असतो. मात्र, रुग्णालयाजवळच मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. त्याचा रुग्णांवर विपरित परिणाम होत असून याबाबत समाज कधी संवेदनशील होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकांनी आपल्या चारचाकी वाहनांमध्येच अशा प्रकारची साउंड सिस्टीम बसवून घेतली आहे की ते आसपासच्या सर्व नागरिकांना आपल्या गाण्यांच्या तालावर जागे करु शकतात.
अंर्तगत रस्त्यांच्या मधोमध सेलिब्रेशन
शहरातील अनेक भागातील अंर्तगत रस्ते अरुंद आहेत. मात्र, रस्त्यावर वाढदिवस साजरे करण्यासाठी सार्वजनिक रस्तेही बंद केले जातात. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते.
असे रस्ते बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. शहरासह उपनगर, झोपडपट्टीत असे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.