पिंपरी, (प्रतिनिधी) – तिकीट आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे. याद्वारे प्रवाशांना सुलभतेने बसचे आगाऊ तिकीट बुक करता येते. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना याचा फायदा होत आहे. एसटीने npublic.msrtcors.com हे संकेतस्थळ नव्याने सुरु केले आहे. तिथून प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित तिकीट मिळवता येणार आहे.
सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने गावी जाणाऱयांची गर्दी मोठी आहे. ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेकांना आरक्षण केंद्रांवर जाऊन बुकिंग करावे लागत होते. परिणामी आरक्षण केंद्रांवर मोठी गर्दी होत होती. एसटीने MSRTC Bus Reservation हे एप्प तयार केले होते. त्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट बुक करता येत होते.
मागील काही महिन्यांपासून या एपमध्ये प्रवाशांना अडचणी येत होत्या. एसटीच्या संकेतस्थळावरून देखील तिकीट बुक करताना काही अडचणी येत असत. त्यामुळे एसटीने केवळ तिकीट आरक्षणासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरु करून प्रवाशांची गैरसोय दूर केली आहे. एसटीने npublic.msrtcors.com हे संकेतस्थळ नव्याने सुरु केले आहे. परिणामी आता प्रवाशांना तिकीट आरक्षण करताना अडचणी येणार नाहीत.
एसटीच्या प्रवास सवलती
एसटीने प्रवाशांना अनेक प्रकारच्या तिकीट सवलती दिल्या आहेत. त्या सवलतींमध्ये देखील या संकेतस्थळावर तिकीट काढता येईल. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग अशा विविध सवलतींचा इथे उपयोग करून तिकीट काढता येत आहे. परिणामी विविध सवलतींचाही या संकेतस्थळावरून लाभ संबंधित प्रवाशांना घेता येणार आहे.
२४ तास सेवा
ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास 7738087103 या क्रमांकावर संपर्क करून माहिती घेता येईल. ही सेवा 24 तास सुरु आहे. तसेच ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरून देखील तिकीट न मिळाल्यास 0120-4456456 या क्रमांकावर माहिती देता येणार आहे. या क्रमांकावरून अडचणी येणाऱ्या प्रवाशांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. त्यामुळे या पुढे आता प्रवाशांना तिकीटासाठी अडचणी येमार नाहीत.