सिंहगड रस्ता/विश्रातवाडी, -पुणे महापालिकेच्या शहर बांधकाम विभाग झोनच्या वतीने शहर तसेच उपनगर परिसरातील अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना समाधानकारक उत्तरे येत नसल्याने अशा बांधकामांची पाहणी करून ती नियमांतर्गत आढळली नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात अनधिकृत बांधकामांवर कारवाई थंडावली होती. परंतु, पुन्हा एकदा महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे शहरासह उपनगरांतील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे. उपनगरात तसेच समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याने त्यामध्ये अडथळा ठरणारे अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.
रायकरमळ्यात चार मजली इमारत पाडली
सिंहगडरस्ता -सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील रायकर मळा भागात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या शहर बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या वतीने कारवाई करण्यात आली. धायरीत चार मजली इमारत पाडून तीन हजार चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेच्या जॉ-कटरच्या साहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले. एक जेसीबी, पोलीस कर्मचारी तसेच 12 बिगारी सेवकांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
शहर बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनकडून अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपअभियंता विजय कुमावत, शंकर धुदुसकर, कनिष्ठ अभियंता संदेश पाटील, हेमंत कोळेकर, धनंजय खोले, निशिकांत छापेकर, उमेश गोडगे, प्रशांत मोरे, अभिजित भुजबळ यांच्यासह सिंहगड रस्ता पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
जागामालकांनी केला विरोध…
धायरी परिसरातील या अनधिकृत इमारतीवर शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या वतीने कारवाईस सुरुवात झाली. यावेळी सुरुवातीला स्थानिक नागरिक व जागा मालकांनी या कारवाईला विरोध केला. मात्र, या विरोधाला न जुमानता पालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत शांतता राखली, त्यामुळे पालिकेने ही कारवाई पूर्ण केली.
समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजून तयार व्हायचा आहे. तो तयार करताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे. नागरिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत, अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल.
– हेमंत मोरे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग