तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील खरीप भात पिकाचे बी बियाणे खरेदी करण्यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकरी विविध दुकानांमधून खते, बी-बियाणे खरेदी करत आहेत. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. मावळ तालुक्यात हा पाऊस पाच ते दहा जून च्या दरम्यान येईल असा अंदाज गृहीत धरून शेतकरी खरीप पिकाच्या मशागतीसाठी व बी बियाणे जमा करण्याच्या तयारीला लागले आहेत.
मावळ तालुका हा खरीप भात उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला तालुका आहे. फक्त भातच नव्हे तर खरीप हंगामासाठी नाचणी, सोयाबीन, भुईमूग, चवळी, वाटाणा, तुर, हायब्रीड ज्वारी, मका, मूग, उडीद, पावटा इत्यादीची पिकांसाठी बियाणे जमा करीत आहेत. या तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर पर्यंत खरीप भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.
भात लागवडी पूर्वी कमीत कमी २१ ते २५ दिवस अगोदर भाताची रोपे तयार करावी लागतात. त्यासाठी चांगले बियाणे मिळवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. यावर्षी शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. सध्या शेतकऱ्याकडून शेतात ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साह्याने नांगरणी, कोळवणी सुरू आहे.