पिंपरी, (प्रतिनिधी) – महावितरणच्या वाढलेल्या वीज बिलाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. एप्रिल महिन्यापासून लागू झालेली दरवाढ आणि उन्हाळ्यामुळे वाढलेला वीज वापर या प्रमुख कारणांमुळे वीज बिलात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे.
महावितरण वीज बिलात सरासरी ११ टक्क्यांपर्यंत दरवाढ सांगण्यात येत असली तरी इतर शुल्कांमध्ये केलेली वाढ आणि उन्हाळ्यामुळे वाढलेल्या वीज वापराने अनेक ग्राहकांना यंदा दुप्पट वीज बिल आहे. मागील महिन्याच्या दुप्पट वीजबिल आल्याने वीज ग्राहक त्रस्त झालेले आहेत. त्यात सतत खंडित होणारा वीजपुरवठा आणि बिल मात्र दुप्पट अशी ग्राहकांची स्थिती झाली आहे.
महावितरणकडून एप्रिल महिन्यापासून वीज दरवाढ लागू झाली आहे. युनिटनुसार दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या वीजग्राहकांना त्याचा कमी फटका बसत असला तरी १०० युनिटपेक्षा जादा वीज वापर असणाऱ्यांना वाढीव वीज दरवाढीचा चांगलाच फटका बसत आहे.
त्यातच सध्या कडक उन्हाळा असल्याने घरगुती आणि औद्योगिक अशा दोन्ही प्रकारच्या वीजग्राहकांची विजेची मागणी वाढली आहे. असहय्य उकाड्यामुळे दिवसा आणि रात्री फॅन, एसी, कुलर, फ्रीज आदींचा वापर वाढला आहे. परिणामी वीज मागणी वाढली आहे.
त्यातच विविध कारणांनी दिवसभर वीज पुरवठा विविध कारणांनी खंडित होत असतो. तर, उन्हाळ्यामुळे वाढलेला विजेचा वापर व त्यात महावितरणने केलेली दरवाढ यात सर्वसामान्य ग्राहक सापडले असून दुप्पट वीज बिलाने ग्राहक हैराण झाले आहेत.
आकारल्या जाणाऱ्या वीजबिलात सरासरी ११ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एलटी (लो व्होल्टेज) आणि एचटी (हाय व्होल्टेज) वीजग्राहकांसाठी प्रतियुनिट दर, इंधन अधिभार, मागणी अधिभार अशा सर्वांमध्येच वाढ झाली आहे. त्याचा फटका उद्योजकांना बसत आहे. त्यामुळे विजेवरील खर्च वाढला आहे.
वीज बिलात झाली भरसाठ वाढ
फेब्रुवारी महिन्यात ज्या घरगुती वीज ग्राहकांना ८०० रुपयांपर्यंत वीज बिल येत होते. त्यांना एप्रिल महिन्यात तब्बल १ हजार ६०० रुपयांपर्यंत वीज बिल आले आहे. तर, मे महिन्यात तर वीज बिलाचा हा आकडा दोन हजार रुपयांपुढे जाऊन पोहचला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच आर्थिक शॉक लागलेला आहे.
वीज वापराच्या टप्प्यांचा खेळ
महावितरणने वीज वापराचे टप्पे तयार केले असून ० ते १०० पर्यंत प्रति युनिट दर ५.८८ प्रति युनिट आहेत. परंतु सोबतच इंधन अधिभार, मागणी अधिभार, स्िथर आकार, वहन आकार असे अनेक आकार जोडत वीज बिल वाढविले जाते. आज प्रत्येक घरात टीव्ही, फि्रज, फॅन असतात यामुळे शंभर युनिटच्या आत वापर होणे जवळपास अशक्य आहे.
विशेषत: उन्हाळ्यात २४ तास फॅन चालू राहत असल्याने वापर वाढतो. शंभर युनिटच्या पुढे जाताच दर दुप्पट होऊन ११ रुपये ४६ पैसे प्रति युनिट होतो. तीनशे युनिटच्या पुढे हा दर १४ रुपये ७२ पैसे प्रति युनिट होतो. तर पाचशे युनिटच्या पुढे हा दर १८ रुपयांच्या पुढे जातो.