पिंपरी, (प्रतिनिधी) – एसटी महामंडळाकडून महाकार्गोद्वारे मालवाहतूक सुविधा सुरू केली आहे. सुरुवातीला गाड्यांची संख्या जास्त असल्याने याद्वारे एसटीला महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत होते. परंतु, सध्या मालवाहतूक गाड्यांची संख्या कमी झाल्याने महाकार्गोच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून एसटी महामंडळाला तोटा होत आहे. सध्या वल्लभनगर विभागात केवळ एकाच मालवाहतूक वाहनाद्वारे सेवा सुरू आहे.
कोरोना काळात सर्व वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाने १ मे २०२० रोजी मालवाहतूक सेवा सुरू केली. त्यासाठी गाड्यांमध्ये अंशतः बदल करून माल वाहतुकीसाठी लागणारे वाहन तयार करण्यात आले व सेवेचे महाकागों असे नामकरण करण्यात आले.
सुरक्षित आणि स्वस्त दरात मिळणाऱ्या सेवेमुळे नागरिकांचा यास उत्तम प्रतिसाद मिळत होता. या सेवेतून एसटीला महिन्याला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत होते. परंतु, मालवाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने भंगारात निघाल्याने या सेवेतील वाहने कमी झाली आहेत. परिणामी मालवाहतुकीसाठी गाड्यांचा तुटवडा आहे.
वाजवी दर, खात्रीशीर सेवा
करोना काळात प्रवासी सेवा बंद असताना एसटीची मालवाहतूक सेवा मात्र जोरात सुरू होती. वाजवी दर, खात्रीशीर सेवा आणि सुरक्षिततेमुळे या सेवेला खासगी आणि सरकारी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. सुरुवातीला पुणे विभागात ७८ बसद्वारे मालवाहतूक सेवा सुरू होती.
त्यामुळे दिवसाला आठ ते नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु, सध्या पुणे विभागात ४१ बसद्वारे तर, वल्लभनगर विभागात केवळ एकच मालवाहतूक वाहनाद्वारे सेवा सुरू आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. मालवाहतूक गाड्यांना मागणी आहे. परंतु, बस कमी झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे.
वल्लभनगर आगारात एकच वाहन
वल्लभनगर आगारात सुरवातीला पाच वाहने मालवाहतूक सेवेसाठी होती. त्यांची संख्या नंतर पाचवरून दोनवर आली. काही दिवसांपूर्वी यातील एक वाहन भंगारात काढण्यात आल्याने आता आगारात केवळ एकाच वाहनाद्वारे ही सेवा दिली जात आहे.
पुणे विभागातील मालवाहतूक
वर्ष फेऱया कापलेले अंतर उत्पन्न
२०२१-२२ २५९९ ४,९५,११० २ कोटी ३८ लाख
२०२२-२३ १९२४ ३.१३, ३४३ १ कोटी ९१ लाख
२०२३-२४ ८२६ १,२९,०९४ ८७ लाख ३५ हजार