खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी शहरातील रस्ते खोदले आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी खोदलेले रस्ते पूर्ववत केलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात खोपोलीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे.
खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी शासनाकडून 96 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. अनेक वर्षापासून भुयारी गटार योजनेचे काम प्रलंबित होते. या योजनेचे पाइप टाकण्यासाठी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते ठेकेदाराने खोदले आहेत.
पावसाळा तोंडावर आला असतानाही रस्ते पूर्ववत केलेले नाहीत. त्यामुळे खोपोलीकरांना पावसाळ्यात मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे भुयारी गटार योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते लाखो रुपये खर्च करून नुकतेच तयार करण्यात आले आहेत.
रस्ते खोदाईनंतर तात्पुरती मलमपट्टी करून तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आत्ताही नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. पावसाळयापूर्वी अशी परिस्थिती असताना पावसाळ्यात काय होईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवडणुकीपूर्वी आणि नंतरही माजी नगरसेवक किंवा राजकीय पक्षाचे नेते याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत.