केंद्र आणि राज्य सरकारने घेतली दखल
बारामती – बारामती येथील रुचिता क्षीरसागर ही नऊ वर्षीय चिमुकली गायनातून साक्षरतेचा प्रचार करत आहे. तिचा व्हिडिओ केंद्र शासनाने उल्लास या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. 72 वर्षीय निरक्षर सुशीला आजी हिला शिकवतानाच्या तिच्या प्रेरणादायी छायाचित्राची यापूर्वी केंद्र व राज्यानेही प्रशंसा केली होती. राज्याचे योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी बारामती येथे दोघींचा गौरव केला.
चालू वर्षी 8 सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनी महाराष्ट्रात नवभारत साक्षरता अभियानाची सुरुवात करण्यात आली. निरक्षर आणि स्वयंसेवकांसाठी या दोघी आजी नातींचे या छायाचित्र प्रेरणादायी ठरत आहे. त्यांचे मूळगाव टोणेवाडी (ता. बार्शी) असून तीन वर्षांपूर्वी ते बारामतीत स्थलांतरित झाले आहेत.
सुशीला आजी मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे. त्यांचा साक्षरता वर्ग नातीने घरीच सुरू केला आहे. रुचिता हिने आजीला शिकविण्याबरोबरच “हम मिल जुलकर लिखते पढते जाऐंगे’ या हिंदी गीतातून सावित्रीबाईंच्या वेशात साक्षरतेचा जागर सुरू केला आहे. तिचा स्तुत्य उपक्रम देशभर पोहोचावा म्हणून केंद्राने नवभारत साक्षरतेच्या उल्लास फेसबुक पेजवर तिचा हा व्हिडिओ प्रशंसा करीत पोस्ट केला.
योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी बारामती येथे त्यांच्या घरी भेट देऊन आजी-नातीचा गौरव केला. यावेळी माजी शिक्षणाधिकारी पोपट काळे, राजेश क्षीरसागर, ज्योती क्षीरसागर, आबा जगताप, गौरव माने, सारिका माने, विठ्ठल साळवे उपस्थित होते. रुचिता ही अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामतीमध्ये तिसरीत शिकत असून तिला संगीत शिक्षिका जयश्री कुलकर्णी, सुवर्णा जमदाडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
नवभारत साक्षरता अभियानात शाळांनी सर्व्हे करून स्वयंसेवकांच्या मदतीने निरक्षरांना साक्षर करावयाचे आहे. घरातील असाक्षरांना त्यांच्या कुटुंबीयांनी साक्षर करणे अभिप्रेत आहे. कुटुंबात निरक्षर नसतील तर शेजारी असलेल्यांनाही साक्षर करता येऊ शकते. प्रौढ असाक्षरांनी योजनेत सहभागी होऊन स्वतचा उत्कर्ष साधावा आणि राष्ट्रकार्यास मदत करावी
-डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना), पुणे.