7 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
राजगुरूनगर – राजगुरूनगर येथील भुमी अभिलेख कार्यालयात खासगी तत्वावर टायपिस्ट म्हणून काम करणार्या महिलेला 7 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली.
सुनंदा गणेश वाजे असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तक्रारदार यांचे पतीचे नावे मु.पो. साबर्डी (ता. खेड) येथे गट नं. 245 मध्ये एकूण 63 गुंठे शेत जमीन असून, या गटाची मोजणी करण्याकरीता तक्रारदाराच्या पतीने दि. 1 जानेवारी 2024 राजी उपअधीक्षक भुमी अभिलेख, नगर भूमापक अधिकारी, यांच्याकडे अर्ज दिला होता.
सुनंदा वाजे या सध्या नगर भूमापन अधिकारी खेड कार्यालयामध्ये खासगी टायपिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी तक्रारदाराकडे हे काम करण्यासाठी प्रथम 12 हजार रुपये व त्यानंतर ऑनलाइन फॉर्म भरण्याकरीता आणखी दोन हजार रुपये लागतील असे सांगितल्यावर तक्रारदाराने ही रक्कम रोख स्वरुपात दिली. तक्रारदार यांच्या पतीच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी करण्यात आली. त्यानंतर वाजे यांनी तक्रारदार यांना फोन करुन, लोकसेवकाने जमीन मोजणी करीता आणलेली मशिनचे आणखी 6 हजार रुपये व जमीनीचे कागदपत्र तयार करणेकरीता 3 हजार रुपये असे एकूण 9 हजार रुपये इतक्या लाचेची मागणी केली होती
तक्रारदार महिलेने याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, वाजे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष वरील कामकाजासाठी लोकसेवकाकरीता तडजोडीअंती 7 हजार रुपयाची लाच रक्कमेची मागणी केली. त्यानुसार लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी सोमवारी (दि. 22) सापळा रचला. वाजे यांनी तक्रारदाराकडून सात हजार रुपये लाच रक्कम कार्यालयत पंचासमक्ष स्विकारल्यावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.