मंदिरास फुलांची सजावट, फटाक्यांची आतषबाजी
परिंचे – हरणी (ता. पुरंदर) येथील डोंगरावरती परिंचे परिसरातील कावडीचे शिड उभे राहिल्यापासून परिसरातील अनेक कावडी महाराष्ट्र तसेच बाहेरच्या राज्यात जाऊन तेथील तीर्थक्षेत्राला जलाभिषेक घातला. हरिणी, परिंचे, वाल्हे, वीर, पिंगोरी, नवलेवाडी, हरगुडे, सटलवाडी, पांगारे, मांडकी गावच्या कावडी हरणी महादेव डोंगरावर दाखल होऊन मंदिरासमोर नाचवण्यात आल्या.
पाच मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर रात्री बारा वाजता महादेवाच्या पिंडीवर पाण्याची धार घालण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हर हर महादेव च्या गजरात संपुर्ण परिसर दुमदुमला होता शेकडो भाविकांनी शंभू महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
शंभू महादेवाला अभिषेक करून महापूजा करण्यात आली. सकाळी आठ वाजता आरती करून डोंगरावरील पांडवकालीन पाण्याच्या टाक्यावर कावडीचे पितळी रांजण पाण्याने भरून वाजत-गाजत डोंगराच्या मध्यावर असलेल्या हरणाई माता व कानिफनाथ (माईंब) देवाच्या दर्शनासाठी नेण्यात आले तेथील मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून कावडी पुन्हा हरेश्वर मंदिर समोर आणण्यात आल्या.
कावडीचे रांजण पुन्हा पाण्याने भरून कावड खांद्यावर घेऊन कावडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल पाच मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून रांजणातील पाण्याने शंभू महादेवाच्या स्वयंभू मूर्तींना जलाभिषेक घालून दुपारी बारा वाजता कावडीची पूजा करून कावडीच्या मालकांच्या हस्ते कावड्यांना दवणा देण्यात येणार आला.
देवस्थान कमिटीच्या वतीने मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने संपूर्ण डोंगर परिसर उजळून निघाला होता मंदिराच्या मुख्य सभामंडपाला फुलांची सजावट करण्यात आली होती. कावड उत्सवानिमित्त डोंगराला यात्रेचे स्वरूप आले होते.
यात्रा उत्सव काळात भाविकांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाणी, मंदिर परिसर स्वच्छता, दर्शन रांगा आदी सुविधा पुरविण्यात आली होती. उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थानचे पुजारी महादेव यादव, रामचंद्र यादव, नारायण यादव, हनुमंत यादव तसेच हरणी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले आहेत.