पुणे – बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीच्या जामिनासाठी बनावट जामीनदार म्हणून उभा राहिलेल्या रिक्षा चालकासह दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मध्यंतरी पुणे पोलिसांनी बनावट जामिनदारांची टोळी उद्ध्वस्त केली होती. त्यांनी हजारो प्रकरणांमध्ये बनावट जामिनदार दिले होते. यानंतर “सीआयएस’ प्रणालीचा वापर सुरु केला. या प्रणालित हा बनावट जामिनदार सापडला. योगेश उमेश सुर्यवंशी (२९, रा.पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव आहे.
तर त्याला बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. एका गुन्ह्यातील आरोपी शिव पवन झंवर याच्या जामिनाची सुनावणी शिवाजीनगर न्यायालयात सुरू होती. त्याच्या वकिलांनी जामिनदारास हजर केले. त्याची समक्ष आणि “सीआयएस’ संगणक प्रणालीद्वारे पडताळणी केली.
त्याने स्वत:चे नाव शंकर भिकु राठोड सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याचे नाव योगेश सूर्यवंशी असल्याचे निदर्शनास आले. पैसे घेऊन बनावट जामिनदाराची कामे आरोपी करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक माने करत आहेत.