पुणे – शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात ५ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सोहळ्याला स्वागताध्यक्ष राष्ट्वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, निमंत्रक उदय सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
यावेळी नाट्य परिषद पुणे शाखेचे विजय पटवर्धन, दीपक रेगे, समीर हंपी, सत्यजित धांडेकर, सुनील महाजन, अण्णा गुंजाळ, अशोक जाधव, चेतन चावडा, योगेश सुपेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत गणेश कला क्रीडा मंचावर अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत.
सकाळी ८ वाजता बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ५०० दुचाकी आणि १० रथावर विराजमान झालेल्या ज्येष्ठ कलाकारांचा आणि १०० विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या १०० पात्रांचा समावेश या रॅलीमध्ये असणार आहे.
सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पूजन होऊन, कार्यक्रमांना प्रारंभ ह. भ. प. चारुदत्त आफळे यांच्या सुरेल नाट्य संकीर्तनाने होणार आहे. सकाळी ११ वाजता ३५ कलाकारांच्या साथीने डॉ. भावार्य देखणे यांचे बहुरूपी भारुड सादर होणार आहे. दुपारी १२.३० वाजता नाटक माझ्या चष्म्यातून’ हा परिसंवाद होणार आहे.
दुपारी १.३० वा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि रेश्मा वर्षा परितेकर यांचा ४० जणांच्या संचासह पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम होईल. दुपारी २.३० वा. दीडशेहून अधिक कलाकारांच्या ताफ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा नयनरम्य शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहेत.
दुपारी ३ वाजता २० गायक कलाकारांसह निनाद जाधव आणि रवींद्र खरे यांचा नाट्य धारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वा. गायक राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांचा बहारदार नाट्य गीतांचा कार्यक्रम सादर होईल. रात्री ८ वाजता मराठी गीतांची सुरेल संगीत रजनी लखलख चंदेरी हा कार्यक्रम होणार आहे.