पुणे – येथील राजर्षि शाहू सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधाकर हरिभाऊ पन्हाळे यांची, तर उपाध्यक्षपदी शांताराम उद्धवराव धनकवडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सहकारी संस्था सहायक निबंधक बी. एल. साबळे, बँकेचे संचालक अभय मोहिते, सचिन पन्हाळे, सतीश नाईक, डॉ. सुनील जगताप, सुबीर कोतवाल, मनन शिंदे, एल. बी. जाधव, पद्माकर पवार, संचालिका श्यामकौर शिंदे, कुसूमताई अडसुळे, मंगलाताई जाधव, कमलताई व्यवहारे, शिवालीताई भोसले, आनंदी कुलकर्णी, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पासलकर हे उपस्थित होते.
सुधाकर पन्हाळे हे बँकेचे संस्थापक संचालक असून, बँकेच्या एकूण चाळीस वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. बँकेचे संस्थापक व अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांचे निधन झाल्याने बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा पन्हाळे यांनी स्वीकारली आहे.
तर, बँकेच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेले शांताराम धनकवडे हे शहरातील नामांकित उद्योजक असून, गेली अनेक वर्षे बँकेचे संचालक आहेत. यापूर्वीही त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच आबासाहेब शिंदे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालकपदच्या जागेवर मनन दिलीप शिंदे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली.
यावेळी नूतन अध्यक्ष सुधाकर पन्हाळे यांनी बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत प्रगतीमय / चांगली असून यापुढेही ती अशीच प्रगतीमय ठेवायची आहे. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि उत्तम व्यवस्थापनाचे (FSWM) निकष पूर्ण करत असल्याने बँकेस दोन नवीन शाखा सुरू करता येणार आहेत, असे सांगितले.
दरम्यान, बँकेने स्थापनेपासून अल्पशा काळातच जिल्ह्यातील नागरी सहकारी टॉप १० बँकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. बँकेस दि महाराष्ट् अर्बन को-ऑप. बॅक्स फेडरेशन लि. मुंबई यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक स्पर्धेत बँकेस सलग नऊ वर्षे सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनमार्फत सलग १७ वर्षे उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापनाचे पुरस्कार बँकेस मिळाले आहेत, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पासलकर यांनी दिली.
“बँकेच्या एकूण १५ शाखा स्वमालकीच्या जागेत संपूर्ण संगणकीकृत व एटीएम सेंटरसह कार्यरत आहे. आता बाजीराव रस्ता येथे सर्व डिजिटल सुविधांसह स्वमालकीच्या नूतन इमारतीमध्ये लवकरच बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे स्थलांतर होत आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रू.१,६६८ कोटी असून एकूण ठेवी रू. १,०३९ कोटी व कर्ज वाटप रू.६२९ कोटी आहे. बँकेचा नेट एनपीए १.४४% असून बँकेने स्थापनेपासून ऑडिट अ वर्ग परंपरा कायम राखलेली आहे.” – सुधाकर पन्हाळे, अध्यक्ष, राजर्षि शाहू सहकारी बँक