अवैध दारू विक्रेत्यास पाठलाग करून पकडले

देशमुखनगरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची धाडसी कारवाई

नागठाणे – रात्रीच्या वेळी कामावरून घरी निघालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास चकवा देऊन पळून जात असलेल्या अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या संशयितास बोरगाव पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्याने पाठलाग करून रंगेहाथ पकडले. तिच्या या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे. मेघा शरद बनसोडे असे या धाडसी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री देशमुखनगर ते नांदगाव यांदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी दारू वाहतुक करणारा शहारुख जानी शेख (वय 22, रा. रहिमतपूर (काशीद गल्ली), ता. कोरेगाव, हल्ली रा.मोळाचा ओढा, सातारा) याच्यासह दारू पुरवठा करणारा आमिर गुलाब मुलाणी (रा. देशमुखनगर, ता. सातारा) या दोंघांवर गुन्हा दाखल केला असून दुचाकीसह देशी दारूच्या अडीच हजार रुपये किमतीच्या बाटल्या असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री महिला पोलीस मेघा बनसोडे या ड्युटी संपवून देशमुखनगर मार्गे घरी निघाल्या होत्या. त्या देशमुखनगर-नांदगाव रस्त्यावरून जात असताना त्यांना एक युवक विना नंबरप्लेट असलेल्या यामाहा एफ झेड दुचाकीवरून दारूचा बॉक्‍स घेऊन त्यांना क्रॉस करून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच स्वतः या दुचाकीचा पाठलाग करून युवकाला नांदगाव पुलाजवळ अडवले. त्याच्याकडे त्यांनी अधिक चौकशी केली असता युवकाने स्वतःचे नाव शहारुख जानी शेख असल्याचे सांगून देशी दारूचा बॉक्‍स देशमुखनगर येथून आमिर गुलाब मुलाणी याने तारगाव येथे देण्यासाठी पाठवल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती मेघा बनसोडे यांनी सपोनि संतोष चौधरी यांना सांगितली. महिला कर्मचारी एकटीच घटनास्थळी असल्याचे समजल्यावर त्यांनी तात्काळ नांदगाव येथील काही युवकांना पोलीस येईपर्यंत घटनास्थळी जाऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी नांदगावच्या युवकांनीही लगेच घटनास्थळी धाव घेतली. याच वेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे काही कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितास अटक करून दारू बॉक्‍स व दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या घटनेची फिर्याद मेघा बनसोडे यांनी दाखल केली असून शहारुख जानी शेख याच्यासह अवैध दारूविक्रेता अमीर गुलाब मुलाणी दोघांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, या मेघा बनसोडे यांनी एकट्या असूनही दाखविलेल्या धाडसाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.