“आरपी’ आणि ऍमेनिटी स्पेसला मिळणार “टीडीआर’
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हद्दीमध्ये “टीडीआर’ (हस्तांतरणीय विकास हक्क) देण्यास सुरूवात झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेर प्रथमच टीडीआर वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक विकास आराखडा (आरपी) आणि ऍमेनिटी स्पेसच्या जागांसाठीच हा “टीडीआर’ देण्यात येत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेर सुनियंत्रित विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने “पीएमआरडीए’ची स्थापना करण्यात आली. डिसेंबर 2018 मध्ये “पीएमआरडीए’ हद्दीसाठी राज्य सरकारने बांधकाम नियमावली मंजूर केली. यात “पीएमआरडीए’ हद्दीत आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी “टीडीआर’ची तरतूद करण्यात आली आहे. हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचेही काम “पीएमआरडीए’कडून अंतिम टप्प्यात आले आहे. नियमावली मंजूर झाल्यामुळे विकास आराखडा अंतिम होईपर्यंत “पीएमआरडीए’ हद्दीत प्रादेशिक विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले रस्ते ताब्यात घेऊन ते विकसित करणे आता शक्य होणार आहे. त्या मोबदल्यात जागा मालकाला “टीडीआर’ देण्यास “पीएमआरडीए’कडून सुरूवात करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे “पीएमआरडीए’च्या हद्दीत सुमारे साडेतीनशेहून अधिक ऍमेनिटी स्पेस ताब्यात आल्या आहेत. त्या जागांचा मोबदलादेखील “टीडीआर’ स्वरूपात देणे यामुळे शक्य होणार आहे.