राज्यात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, ठाण्यासह कोकणातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई : भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि उपनगर, ठाणे आणि रायगडमध्ये आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यासह कोकणातील शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्‌विट करून याबाबत माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला झोडपून काढले होते. परंतु आता पाऊस परतीच्या मार्गाला लागला आहे. कोकण आणि गोव्यात सध्या मान्सून सक्रिय असून गेल्या 24 तासांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. तसेच शनिवारपर्यंत पाऊस सक्रिय राहण्याची चिन्हे यापूर्वीच वर्तवण्यात आली होती.

भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार या ठिकाण मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनीदेखील ट्‌विट करत सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याची विनंती केली आहे.

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील घडामोडींतून तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी मुंबई, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत घाटमाथ्यावर विखुरलेल्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×