विधानसभेला विक्रमी मताधिक्य देण्याची कार्यकर्त्यांची ग्वाही; अज्ञातांनी फ्लेक्स फाडल्याने तणाव
भुईंज – आ. मकरंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भुईंज पंचक्रोशीत तीन कोटी 89 लाख 65 हजार रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला. भर पावसातही राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या विधानसभा निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांना भुईंज पंचक्रोशीत विक्रमी मताधिक्य देण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.
भुईंज येथे नितीन पाटील यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, पंचायत समितीच्या सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, माजी सभापती प्रमोद शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, माजी सदस्य दिलीप बाबर, बाजार समितीचे उपसभापती दीपक बाबर, आसलेचे सरपंच अनिल चव्हाण, प्रकाश पावशे, सुधीर भोसले, संतोष बाबर, लालासाहेब कांबळे व ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार खरे, पूनम शिंदे, सुजाता भोसले, शैनाज मुलाणी, नारायण नलवडे, मंगल शेवते उपस्थित होत्या.
फुलेनगर येथे 30 लाख रुपये खर्चाची पिण्याच्या पाण्याची टाकी, कबरस्तानमध्ये सभामंडप (सहा लाख), दलित वस्तीत सभामंडप (सहा लाख), पशुवैद्यकीय दवाखाना (60 लाख), विजयनगर येथे रस्ता व गटार (तीन लाख), मालदेवाडी येथे गटार (दोन लाख), भुईंज येथे स्मशानभूमीत प्रतीक्षालय (चार लाख), वरचे चाहुर येथे अंगणवाडी इमारत (साडेसहा लाख), भिरडाचीवाडी येथे रस्ता (पाच लाख), अंतर्गत रस्ता (तीन लाख), भुईंज- भिरडाचीवाडी-शिरगाव रस्ता (एक कोटी 44 लाख) या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. भर पावसातही मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने भुईंज पंचक्रोशीत अजूनही आ. मकरंद पाटील यांचा करिश्मा असल्याचे स्पष्ट झाले.
प्रमोद शिंदे म्हणाले, भुईंज येथील वर्षानुवर्षे रखडलेली विकासकामे आ. मकरंद पाटील यांनी मार्गी लावली आहेत. विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या भूलथापा, प्रलोभनांना बळी न पडता आ. पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणा. भुईंज येथील दलित वस्तीतील सभामडंपाच्या शुभारंभप्रसंगी भीमगर्जना मित्रमंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी नितीन पाटील यांचा सत्कार केला.
फ्लेक्स फाडल्याने भुईंजमध्ये तणाव
विकासकामांच्या शुभारंभाचे फ्लेक्स अज्ञातांनी मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास फाडल्याने भुईंज परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध नोंदवून अशा भ्याड कृत्यांना भीक घालणार नसल्याचे सांगितले.
विकासकामे झाकोळली जाणार नाहीत
स्वतः विकास करायचा नाही आणि दुसऱ्याने केलेल्या विकासकामांचे बॅनर फाडायचे, असे करूनही आ. पाटील यांनी भुईंज परिसरात केलेली विकासकामे झाकोळली जाणार नाहीत. येथील मतदार विधानसभा निवडणुकीत त्यांना विक्रमी मताधिक्य देतील, असा विश्वास प्रकाश पावशे यांनी व्यक्त केला.