आंबेगाव बुद्रुक(प्रतिनिधी) : आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, दत्तनगर या परिसरात शनिनगर याठिकाणी १ रुग्ण सोडला तर आत्तापर्यंत कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे हा परिसर ग्रीन झोन मध्ये होता. परंतु काल दत्तनगर येथील एका सोसायटी मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने या भागात खळबळ उडाली असून सदरची सोसायटी पूर्ण पणे सील केली आहे.
पुणे शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामळे दत्तनगर परिसरात सापडलेला रुग्ण हा पुणे शहरात रेड झोन असलेल्या भागात काम करीत असल्यामुळे सदर इसमास संसर्ग झाला आहे. त्याचे कुटुंबात व सोसायटीतील संशयित यांची तपासणी चालू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील सर्वच सोसायटीमध्ये जाऊन तेथे काम करणारे सुरक्षा रक्षक व इतर कामगारांचे रेकॉर्डची तपासणी दत्तनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी केली.
तसेच बाहेरून येणाऱ्या कामगारांना सोसायटीतच राहण्या संदर्भात सोसायट्यांनी उपाय योजना कराव्यात ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे होणारा संसर्ग टाळता येईल.अशा सूचना सोसायट्यांना दिल्या आहेत. यावेळी नगरसेवक युवराज बेलदरे उपस्थित होते.
तसेच सकाळी व सायंकाळी रस्त्यावर आणि सोसायटीच्या आवारात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांच्या वर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती दत्तनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर यांनी दिली. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहनही केले.