“सीआयडी’ आणि लतादीदी

सध्या देशातील सर्वच मनोरंजन वाहिन्यांवर जुन्या कार्यक्रमांच्या पुनःप्रसारणाची रेलचेल आहे. रामायण, महाभारत, कृष्णा, व्योमकेश बक्षी, चाणक्‍य आदी कार्यक्रमांनी दूरदर्शनला जणू गतवैभव प्राप्त करून दिलेलं असताना दुसरीकडे अन्य वाहिन्यांवरही त्या-त्या काळात बहुलोकप्रिय ठरलेल्या मालिका दाखवल्या जात आहेत.

याविषयी अनेक जण आपापल्या अपेक्षाही व्यक्‍त करत आहेत. कुणाला “सिग्मा’ पुन्हा सुरु व्हावीशी वाटते, तर अनेकांना “प्रपंच’ ही मालिका पाहायची आहे. स्वरसम्राज्ञी आणि गानकोकिळा लतादीदींनीही सध्याच्या काळात “सीआयडी’ ही मालिका पुन्हा सुरु करावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली आहे.

सोनी वाहिनीवर प्रसारित झालेल्या “सीआयडी’ या क्राईम शोने इतिहास रचलेला आहे. तब्बल 20 वर्षे चाललेल्या या मालिकेने दूरचित्रवाणीच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चाललेला कार्यक्रम असा विक्रम प्रस्थापित केला आहे. या कार्यक्रमाचे सर्वांत मोठे आकर्षण होते ते एसीपी प्रद्युम्न. ही भूमिका शिवाजी साटम यांनी साकारली होती. त्यांनी ही व्यक्‍तिरेखा इतकी समरसून साकारली आणि जिवंत केली की कित्येकांना आज शिवाजी साटम हे खरोखरीच क्राईम ब्रॅंचचे अधिकारी आहेत, असे वाटते.

शिवाजी साटम यांनी “सीआयडी’खेरीज अलावा विनाशक, वास्तव, कुरुक्षेत्र, बागी, पुकार, नायक आणि जिस देश मे गंगा रहता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. मात्र त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती “सीआयडी’मुळेच!

साधारण दीड वर्षांपूर्वी ही मालिका बंद झाली. पण अलीकडेच शिवाजी साटम यांचा 70 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने साटम यांना शुभेच्छा देताना लतादीदींनी “सीआयडी पुन्हा सुरू व्हावी’ अशी अपेक्षा व्यक्‍त केली. आता त्यांची ही अपेक्षा पूर्ण होते का हे लवकरच समजेल !

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.