नगर (प्रतिनिधी) – राज्यभर गाजलेल्या शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दीपक रावसाहेब कोलते यांच्या खून प्रकरणातील आरोपी पिन्या उर्फ सुरेश कापसे याच्यासह दत्ता विघ्ने व संतोष बोबडे यांची निर्दोष मुक्तता नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरवारी (दि.25) रोजी केली. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी लक्ष घातले होते. सहा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
पोलीस कर्मचारी नितीन भताने व मयत दीपक कोलते हे मुंगी शिवारात गेले असता तिथे पिन्या कापसे व इतर दोघे हा आढळून आल्यानंतर कोलते व आरोपींमध्ये बोलाचाली होऊन त्यामध्ये पिन्या कापसे व इतर दोघांनी धारधार शस्त्राने कोलते यांचा खून केला होता. पोलीस कॉन्स्टेबल नितीन मिठू भताने यांच्या तक्रारीवरुन 3 फेब्रुवारी 2015 रोजी आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. कापसे हा तब्बल वर्षभर फरार होता. त्याला बीड पोलिसांनी बीड जिल्ह्यातून अटक केली होती. तेव्हा पासून तो कारागृहातच होता.
या प्रकरणात तपासा दरम्यान करण्यात आलेल्या महत्वाच्या पंचनाम्यामध्ये सर्व शासकीय पंच पोलीस होते. यामध्ये शेवगांव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत भोसले, अजित लकडे, सुरेश सपकाळे, नेरकर यांच्या साक्षी न्यायालयामध्ये नोंदविण्यात आलेल्या होत्या. आरोपी पिन्या कापसे व दत्ता विघ्ने यांचे वतीने अॅड. सतिश गुगळे यांनी सुनावणी दरम्यान अनेक आक्षेपार्ह बाबी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिल्या. तसेच घटने वेळी मयत पोलीस कर्मचारी दीपक कोलते हे कर्तव्यावर हजर होते,
याबाबतचा पुरावा हा संशयास्पद आहे. तसेच मयत दीपक कोलते यांनी घटनेवेळी दिलेला त्यांचा मृत्यूपूर्व जबाब अत्यंत संशयास्पद आहे, असा बचाव घेऊन त्यासंबंधी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांचे वेगवेगळ्या निकालांचे संदर्भ जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते. सरकारी पक्ष व आरोपीच्या वकिलांनी मांडलेल्या साक्षीपुराव्यांचा विचार करुन जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणी गुरुवार (दि.25) रोजी कारागृहात असलेले तिघांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. दरम्यान, पोलिसाची हत्या झाल्याने नगरच्या कायदेसुव्यवस्थेवर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते.