श्रीनगर, दि.25 –जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या हल्ल्यात उपनिरीक्षकासह सीआरपीएफचे दोन जवान शहीद, तर तितकेच जखमी झाले.
श्रीनगर शहराच्या हद्दीलगत असणाऱ्या भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य केले. गोळीबार करून दहशतवादी पसार झाले. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णालयात पोहचण्याआधीच उपनिरीक्षक मंगाराम देवबर्मन यांची प्राणज्योत मालवली. इतर जखमी जवानांना पुढील उपचारासाठी लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले.
तिथे कॉन्स्टेबल अशोक कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी संबंधित परिसराची नाकाबंदी केली. हल्लेखोर दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.