IPL 2024 ( GT vs RCB Match 45,Virat Kohli Record ) : आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने शानदार खेळी खेळली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या माजी कर्णधाराने 44 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 70* धावा केल्या होत्या. आता या नाबाद खेळीसह विराट कोहलीने बेंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला आहे.
खरे तर गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीने षटकारांच्या बाबतीत एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. कोहलीने आता आयपीएलमध्ये 254 षटकार पूर्ण केले आहेत. डिव्हिलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 251 षटकार ठोकले होते. या यादीत मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा 275 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत कोहलीही त्याचा विक्रम मोडू शकतो. या यादीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 357 षटकार ठोकले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज…
ख्रिस गेल – 357 षटकार
रोहित शर्मा – 275 षटकार
विराट कोहली – 254 षटकार
एबी डिव्हिलियर्स – 251 षटकार
एमएस धोनी – 247 षटकार
आयपीएल 2024 मध्ये 500 धावा पूर्ण…
विराट कोहलीने IPL 2024 मध्ये 500 धावा पूर्ण केल्या आहेत. चालू मोसमात हा आकडा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक धावा केल्यानंतर कोहलीकडे ऑरेंज कॅप कायम आहे. आतापर्यंत किंग कोहलीने 10 सामन्यांच्या 10 डावात 71.43 च्या सरासरीने आणि 147.49 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 500 धावा केल्या आहेत.
आरसीबीची अवस्था आहे वाईट…
गुजरातविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. बंगळुरूने आतापर्यंत या मोसमात 10 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी केवळ 3 जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. तीन सामन्यांमध्ये आरसीबीने पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. संघाचे 6 गुण आणि निव्वळ धावगती -0.415 आहे. मात्र, अद्याप संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही.