करोना संक्रमणापासून बचावासाठी गृहविभागाकडून नियमावली जाहीर
पुणे – ग्रामिण भागाच्या तुलनेत राज्यातील काही ठरावीक शहरात करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. अशा कठीण प्रसंगातदेखील पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागते. कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून सर्व प्रकारची प्रतिबंधात्मक काळजी घेतली जाते. मात्र, तरीदेखील काही पोलिसांना करोनाची बाधा झाली.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग, प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये म्हणून 24 तास पोलीस रस्त्यावर उभे राहून खडा पहारा देत आहेत. बंदोबस्तादरम्यान अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये काही पोलिसांचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे गृहविभागाकडून पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी काम करताना कोणती काळजी घ्यावी, नेमक्या काय उपाययोजना करण्यात याव्यात याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार काम करण्याचे निर्देष दिले आहेत.
पोलीस ठाणे कामकाज, गुन्हे दाखल, तपास प्रक्रिया
– पत्रव्यवहारासाठी कमीत कमी कागदाचा वापर करावा. ई-मेल व ऑनलाइन साधनांचा वापर जास्तीत करावा. तर, स्मार्ट फोनद्वारे पोलीस नियंत्रण कक्षास दिलेली माहिती हीच प्रथम माहिती समजून योग्य चौकशी व तपास करावा.
– गस्त घालण्यासाठी ड्रोनचा वापर करावा.
– सीसीटीव्ही, थर्ड आय सारख्या तंत्रज्ञानाचा वापरदेखील गस्तीसाठी करावा.
गुन्हे घडू नये म्हणून सामाजिक प्रबोधन करावे. तसेच दाखल गुन्हे हे कोर्टात सुनावणीस योग्य नाहीत हे तपासअंती कोर्टाकडून मंजूर करू घ्यावे. सरसकट आरोपपत्र दाखल करू नये.
आरोपी अटक व कोठडीबाबत नियमावली
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाचा वापर करून निवडक गुन्ह्यांतच आरोपीला अटक करावी.
प्रथम आरोपीला सॅनिटायझरच्या टनेलमधून प्रवेश देऊन निर्जंतुकीकरण करावे. त्यानंतर आरोपीचे थर्मल गनद्वारे शरीराचे तापमान तपासावे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करावी. त्याला करोनाची कोणती लक्षणे नाहीत ना याचा अभिप्राय डॉक्टरांकडून घ्यावा. अटक केल्यानंतर आवश्यक तेवढीच पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टाकडे करावी.
लॉकअप गार्ड व प्रभारी अधिकारी यांची दोन तासांनी आरोपीची तपासणी करून घ्यावी. पोलीस कोठडीत सुरक्षित अंतर राखण्याचे नियम सक्तीने पाळण्यास सांगावे. तसेच, आरोपीला एकाच थाळीतून जेवण द्यावे. त्याची थाळी दुसऱ्या आरोपीला वापरू नये.
पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार, प्रक्रियाबाबत
– तक्रारदाराला पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातील निर्जंतुकीकरण टनेलमधून प्रवेश द्यावा. त्याने तोंडाला मास्क घातला असेल तरच आतमध्ये प्रवेश द्यावा, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
– तक्रारदाराशी सुरक्षित अंतर ठेऊनच संवाद साधणे गरजेचे. सध्या पोलीस चौक्या बंद असून सर्व तक्रारदार यांना पोलीस ठाण्यातच येण्यास सांगावे व तेथूनच कामकाज करावे. त्यासाठी संबंधीत फोननंबर जाहीर करावा.
– तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर फोन क्रमांक फलकावर लावावेत.
– अतिमहत्त्वाच्या व दखलपात्र तक्रारी सोडून इतर तक्रारींसाठी फोनवर संपर्क करण्यास सांगावे. त्यामुळे मोबाइल क्रमांक व फोन क्रमांक ठळकपणे जाहीर करावेत.
– तक्रारदारांना आवारात विनाकारण रेंगाळत थांबू देऊ नये. एकावेळी एकाच तक्रारदाराला प्रवेश द्यावा. त्याच्यासोबतच्या व्यक्तीला बाहेर थांबण्यात सांगावे. सुरक्षित अंतर ठेऊन तक्रार घ्यावी.
पोलीस ठाणे, मनुष्यबळ-स्वच्छता, आरोग्य व सुरक्षितता नियम
– कर्तव्यावर असताना पोलिसांनी मास्क, गॉगल व फेसशिल्ड नियमित वापर करावा. तर कंटेन्मेंट झोनमध्ये काम करताना विशेष काळजी घ्यावी.
– सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांनी पोलीस ठाण्यात सॅनिटायजर उपलब्ध करून द्यावे. प्रवेशद्वारावर निर्जंतुकीरणाचे टनेल असावे.
– ठाण्यातील साहीत्य वेळोवेळी निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करावी. रजिस्टर, अभिलेख कमीत कमी हाताळावेत. कामाच्या व विश्रांतीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखावे. अनोळखी व्यक्तीकडून येणारे खाद्यापदार्थ जेवणाचे पॅकेट घेणे बंद करावे.
– पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी एकमेकांचे साहित्य (मोबाइल, काठी, रुमाल, पाणी बॉटल, शस्त्र) वापरू अथवा हाताळू नये. स्वच्छता गृह व वॉशबेसीन दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीरकरण करावे. तसेच, सुरक्षित अंतर व आरोग्य सुरक्षाबाबतचे फलक पोलीस ठाण्यात लावावेत.