पिंपरी – आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी युवक कॉंग्रेसकडून राज्यभर ‘सुपर – एक हजार’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यातून युवकांना संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे निरीक्षक प्रदीप सिंधव यांनी दिली.
शहर जिल्हा युवक कॉंग्रेसची बैठक पिंपरी येथे पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांनी भीमसृष्टी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.
या प्रसंगी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सचिव दादासाहेब काळे, अक्षय जैन, कौस्तुभ नवले, उमेश पवार, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, स्वप्निल बनसोडे, दिपक भंडारी, गौरव चौधरी, अनिल सोनकांबळे, सौरभ खरात, पांडूरंग वीर, हिराचंद जाधव, नासीर चौधरी, संदेश बोर्डे आदी उपस्थित होते. या प्रसंगी शहर युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी निरिक्षकांसमोर आपले मत मांडले. तसेच, विविध प्रश्न उपस्थित केले. सिंधव यांनी त्यांच्याशी संवाद साधत पुढील काम सुरू करण्याबाबत सूचना केल्या.
सिंधव म्हणाले, युवक कॉंग्रेस महाराष्ट्रामध्ये सुपर-एक हजार उपक्रम राबविणार आहे. यामध्ये बूथ यंत्रणेपर्यंत संपर्काचे जाळे सक्षमपणे उभारणाऱ्या सुमारे एक हजार युवकांच्या कामांचे निरीक्षण करून त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबविताना विशिष्ट पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
पृथ्वीराज साठे म्हणाले, सध्या जगभरात गाजलेल्या कृषी विधेयकाविरोधी शेतकरी आंदोलन, उच्चांकी बेरोजगारी, महागाई, अत्याचाराच्या घटना, इंधन दरात वारंवार होत असलेली वाढ या व इतरही केंद्रातील मोदी सरकारच्या चूकीच्या व अन्यायकारक धोरणामुळे देशातील नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आगामी काळात नागरी सहभागातून जनआंदोलने उभारली पाहिजे.