मुंबई – संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतेपद कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी लवकरच सोडणार असून त्यांच्याजागी सर्वानुमते महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांच्या नावाला मान्यता मिळत असल्याची बातमी चर्चेत होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढे जात, लवकरच पवार देशाचे नेतृत्त्व सक्षमपणे करताना दिसतील, असे वक्तव्य केले होते. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
We’ll be happy if Pawar sir becomes UPA chairman. But I’ve heard that he’s personally refused it. We will support him if such a proposal comes to the fore officially. Congress is weak now so the opposition needs to come together & strengthen the UPA: Sanjay Raut, Shiv Sena leader pic.twitter.com/3NNHEjCmPu
— ANI (@ANI) December 11, 2020
संजय राऊत म्हणाले कि, युपीएचे अध्यक्ष शरद पवार झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. हे वृत्त शरद पवारांनीही नाकारले आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते असून आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. पण युपीए अध्यक्षपदाबाबत जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. जर शरद पवारांनी ही गोष्ट स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणे योग्य नाही, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.
तसेच, आम्ही नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचे समर्थन करु, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचे पद ते मिळवू शकले नाहीत, हे सत्य आहे. आपल्याला अशा परिस्थितीत एकत्र येऊन युपीएला मजबूत करावे लागेल. महाराष्ट्रात ज्याप्रकारे महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचे नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय होतील, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतेपद शरद पवार यांना मिळत असल्याची बातमी दिवसभर चर्चेत होती. मात्र, स्वत: शरद पवार यांनी म्हटले आहे की, युपीएचे अध्यक्ष बदलण्याची कोणतीही चर्चा कोणत्याही पातळीवर सुरु नसून, यासंदर्भात येत असलेल्या कोणत्याही बातमीत तथ्य नाही. खुद्द पवार यांच्याच स्पष्टीकरणाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला, तरी त्यानिमित्ताने मोठी राजकीय खळबळही माजली होती.