पिंपरी – शाळा व महाविद्यालयापासून शंभर मीटर परिघाच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस कायद्याने बंदी आहे. मात्र, शहरातील बहुतांश शाळांपासून शंभर मीटरच्या आतच तंबाखूजन्य पदार्थांची जोरात विक्री सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही.
अनेक शाळा, महाविद्यालयांना लागून असलेली लहान दुकाने, किराणा दुकाने, चहाचे स्टॉल, पानटपरींमध्ये सिगारेट, बिडी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. याकडे प्रशासनाची डोळेझाक होत असून पोलीस, अन्न व औषध प्रशासन तसेच शासनाच्या विविध विभागाकडूनही कारवाई होत नाही.
परिसरातच धुंआधुंआ
शाळा व महाविद्यालय जवळील पान टपरी व चहाच्या दुकानात तरूण सिगारेट ओढत असताना दिसतात. त्या दुकानाजवळ सिगारेटचा वास पसरलेला असतो. तेथून शालेय मुलंमुली जात असतात. असे वातावरण पाहून त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच तेही व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. असे तज्ञांचे म्हणणे आहे.
गुटख्याची सर्रास विक्री
राज्यात गुटखा उत्पादन व विक्रीवर बंदी आहे. मात्र, पानटपरी, किराणा दुकानात तो सहज मिळतो. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे या गुटखा विक्रीला नेमका कोणाचा आशिर्वाद आहे. असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
यांना आहेत कारवाईचे अधिकार
प्राचार्य किंवा मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा निरीक्षक, जिल्हा शिक्षणाधिकारी हे शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखू पदार्थाचे सेवन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू शकतात. तसेच सार्वजनिक आरोग्य, आरोग्य सेवा विभागाचे संचालक, केंद्र व राज्य शासनाचा प्रशासकीय प्रमुख, तंबाखू विरोधी पथकाचे नोडल अधिकारी, पोलीस उपनिरिक्षक व त्यावरील अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, केंद्र शासनाच्या उत्पादन शुल्क, कस्टम, सेवा शुल्क, आरोग्य व ट्रान्सपोर्ट विभागाचे निरीक्षक व त्यावरील अधिकारी हे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू शकतात.
शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. अधिकार्यांना तातडीने किरणा दुकाने, पानटपऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देणार आहे.
– अर्जुन भुजबळ, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनक्षा