विश्रांतवाडी : अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या पाहणी दौऱ्याचे आयेाजन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले होते.
विश्रांतवाडी – चुकीच्या पद्धतीने होणारे फुटपाथवरील अतिक्रमण हटविणे, दुरुस्ती करणे, अनधिकृत फ्लेक्स काढणे, एअरपोर्ट रस्त्यावर सिग्नल व्यवस्था सुरळीत करणे आदीवर त्वरीत कार्यवाही करून विकासकामांना निधी देण्यासाठी महापालिका स्तरावर कार्यवाही करू, असे आश्वासन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले.
पुणे महापालिकेच्या प्रभाग दोनमधील नागपूर चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड परिसरातील विविध विकासकामांचा, समस्यांचा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आढावा घेतला. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढाकणे यांनी रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणी दौऱ्यात महापालिका उपायुक्त किशोरी शिंदे, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, आरोग्य निरीक्षक कुटळ आदीसह अधिकारी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी नागपूर चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले.
यामध्ये प्रभागातील ड्रेनेज लाईनमुळे होणारा दूषित पाणी पुरवठा, मंडईचे चुकीचे काम, फुटपाथची दुरवस्था, बायोगॅस प्रकल्पाचे कामकाज, बदामी चौकात सिग्नल यंत्रणा, येरवडा चौकातील संभाव्य वाहतूक कोंडी, गोल्फ क्लब उड्डाणपुलावरून खाली आल्यानंतर दुभाजक बसविण्याची मागणी, कॉमरझोन ते अग्रेसन हायस्कूलच्या रस्त्याचे काम, सम्राट अशोक चौक ते मेंटल चौक रस्ता करणे, चंद्रमानगर येथील बीएसयु पीची घरे लवकर करणे, आदी कामांची माहिती डॉ. धेंडे यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिली.
पुणे महापालिकेत प्रशासक कार्यरत आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे विविध समस्यांचा प्रभागातील नागरिकांना सामना करावा लागत आहे. या वर उपाय काढण्यासाठी या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. या मध्ये प्रभागातील समस्या दाखविल्या. निधी देण्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्तांनी देखील या बाबत सकारात्मक भूमिका घेत कार्यवाही करू असे सांगितले.” – डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका