पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एकमेव असलेल्या वल्लभनगर आगारात दहा दिवसांत 80 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. ऐन दिवाळीत दहा टक्के प्रवास भाडे वाढ करूनही प्रवाशांनी एसटी अर्थात लालपरीला पसंती दिल्याचे यातून दिसून आले आहे. आगारातील आजवरचे सर्वात जास्त उत्पन्न आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसटीला प्रवासासाठी पसंती दिली जात आहे. त्यात प्रवाशांसाठी मागील काही वर्षांपासून विविध सवलतीच्या योजना राबविल्या जात आहेत. परिणामी आगारालाही त्याचा फायदा होत आहे. डबघाईला आलेल्या एसटीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यातून यंदाच्या दिवाळीत वल्लभनगर आगाराला दहा दिवसांमध्ये 79 लाख 51 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. 9 ते 19 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीसाठी एसटी राज्यभर धावली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलनादरम्यान एसटी बस पेटवून देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटीने अनेक भागातील सेवा बंद ठेवली. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर जादा बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्यांना आपल्या गावी दिवाळीच्या सणासाठी जाता यावे यासाठी जादा बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचा फायदा शहरातील प्रावशांनी घेतला. याच दरम्यान एसटीच्या तिकीट दरांमध्ये 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या भाडेवाढीला देखील प्रवाशांनी सकारात्मक घेत चांगला प्रतिसाद दिला.
राज्यभर धावल्या लालपरी
9 ते 19 नोव्हेंबर दरम्यान एसटीला 79 लाख 51 हजार 100 रुपये उत्पन्न मिळाले. 45 बसने 1 लाख 91 हजार 262 किलोमीटर अंतर पार करत हा टप्पा गाठला. 14 नोव्हेंबरला पाडवा, तर 16 नोव्हेंबरला भाऊबीज होती. त्यामुळे 14, 15 आणि 16 नोव्हेंबर या कालावधीत वल्लभनगर आगाराला 21 लाख 81 हजार 209 रुपयांचे उत्पन्न मिळाले. 16 नोव्हेंबरला सर्वाधिक 8 लाख 44 हजार 51 रुपयांचे उपन्न मिळाले.