पुणे – दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनही करण्यात आले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यासाठी 25 नोव्हेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. याची आठवण करून देत मनसेने पुन्हा मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आवाहन केले असून खळ्ळखट्याकचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश दुकानांची नावे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आढळून येतात. विशेषत: मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर अशा शहरांत याचे प्रमाण अधिक आहे. या विरोधात मनसेने आंदोलन करीत महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतून पाटी लावावी, असे आवाहन केले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. यासाठी 25 नोव्हेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. याचीच आता मनसेने आठवण करून दिली आहे. तसेच, दि. 25 नोव्हेंबरपर्यंत दुकानांची नाव मराठीत झाली नाही तर.., खळ्ळखट्याकचा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले की, दुकानांवरील मराठी पाट्या लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल आदेश याप्रमाणे दि. 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीत होणे आवश्यक आहे, यासाठी आता तीन दिवस उरले आहेत.
दोन भाषेत पाट्या करण्याची दुकान मालकांची इच्छा असेलच तर न्यायालयीन आदेशाप्रमाणे मराठी भाषा आधी असली पाहिजे आणि मराठी मधील नाव हे इतर भाषेतील नावापेक्षा लहान नसावे, असे बाबर यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 या कायद्याचा संदर्भही बाबर यांनी दिला आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात सप्टेंबर महिन्यांत निर्देश दिले होते. पुढच्या दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दिवाळी आणि दसऱ्याआधी मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाली वाढविण्याचा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिला होता. आता, यासाठी केवळतीन दिवस उरलेले असून न्यायालयाची आदेशाची आठवण आम्ही करून देत आहोत.” – साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे