दोन आठवड्यांत 2 लाख 39 हजार जणांनी घेतला “लसीचा डोस’
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये परदेशातून आलेल्या तीन आणि त्यांच्या संपर्कातील तीन जणांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. तसेच इतर चारजणांना ओमायक्रानची लागण झाल्याने शहरातील बाधितांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यातच ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत असल्याने निर्माण झालेली भिती व तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने शहरातील लसीकरणामध्ये वाढ झाली आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने गेल्या दोन महिन्यांत लसीकरणाचा वेग देखील मंदावला होता. मात्र, ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर शहरामध्ये लसीकरणाचा टक्का वाढला आहे.
शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत असल्याने लस न घेतलेल्या नागरिकांना पुन्हा लस घेण्यासाठी धाव घेतली आहे. सद्यस्थितीत करोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
शहरामध्ये 5 ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये 2 लाख 39 हजार 64 जणांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यामुळे शहरातील लस घेतलेल्या संख्या झपाट्याने वाढली असून आतापर्यंत 28 लाख 51 हजार 187 करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
ओमायक्रॉन व तिसऱ्या लाटेच्या भितीने लसीकरणाचा वाढलेला वेग कायम राहिल्यास पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल शंभर टक्के लसीकरणाच्या दिशेने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लसीकरण पथकांना मुदतवाढ
शहरामध्ये लसीकरण केंद्र चालविण्यासाठी मेसर्स एम.के. फॅसिलिटी प्रा. लि. यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना एका पथकासाठी 75 हजार 228 रुपये दिले जातात. 9 जुलै 2021 रोजी या संस्थेला 50 पथके शहरातील विविध केंद्रावर पुरविण्यासाठी आदेश देण्यात आला होता. त्याची मुदत दोन महिने होती. लसीकरणाचे काम तातडीचे असल्याने व मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक असल्याने यापूर्वीच्या अटी शर्तींसह मेसर्स एमके फॅसिलिटी प्रा. लि. यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत 66 पथके पुरविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी 1 कोटी 40 लाख 90 हजार 139 रुपये खर्च येणार आहे.