नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने पाच वर्षाखालील बालकाला पल्स पोलिओ चा डोस देता येईल यासाठी शहरात २८१ बुथवर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. याचबरोबर पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन बालकाचे पोलिओचे लसीकरण केले जाणार आहे. सर्वांच्या सहकार्यातून पोलिओ मुक्त भारत ही संकल्पना यशस्वी झाली आहे.
शहरातील सुमारे ४५ हजार पालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, ६० हजार लसीची उपलब्धता करून दिली आहे. शहरातील बालकाचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी पालकांनी आपल्या बालकाला पल्स पोलिओ लसीकरणाचा डोस देऊन घ्यावा, असे आव्हान मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान सुरू असून, कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते बालकाला पल्स पोलिओ चा डोस देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे,आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर, डॉ.अमित करडे, डॉ.वृषाली आरु आदिसह अधिकारी कर्मचारी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
आरोग्य अधिकारी अनिल बोरगे म्हणाले की, आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या आदेशानुसार घरोघरी लसीकरण करण्यासाठी 155 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ट्रांझीट बूथ उभारण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी फूटपाथवर वास्तव्य करणाऱ्या बेघर कुटुंबातील बालकांना लस देण्यासाठी नाईट पथक नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच शहरात बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी धार्मिक स्थळे,उद्याने तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्या आदि सह विविध ठिकाणी लसीकरणासाठी मोबाईल टीम नियुक्त करण्यात आली आहे. शहरातील ५ वर्षा खालील बालकांचे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्टे ठेवले असून पालकांनी देखील सहकार्य करावे, असे आव्हान यावेळी केले.