पुणे – जिल्ह्यात रविवारी (दि. ३) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांना पूर्वीच डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून ही मोहिम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकाऱ्यांनी याचे नियोजन केले आहे. राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३ मार्च रोजी राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार मोहीमेसाठी प्रत्येक गाव व पाड्यावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यासह ४०५ आरोग्य पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.
पाच लाखापेक्षा अधिक बालकांना देणार डोस
या मोहिमेमध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील ग्रामीण भागातील ४ लाख ९८ हजार ७९८ आणि शहरी भागातील ७७ हजार ६४९ अशा एकूण ५ लाख ७६ हजार ४४७ बालकांना रविवार (दि. ३) मार्च रोजी पल्स पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. स्थलांतरित कुटुंबे, ऊसतोड आणि बांधकाम कामगार यांचा शोध घेऊन सर्व ० ते ५ वर्ष बालकांना प्रत्यक्ष भेट देऊन पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
वंचित बालकांना घरी जाऊन डोस
पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस घेण्यात आलेला नसेल, अशा वंचित राहिलेल्या बालकांना घरी जावून पोलिओ डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ५ ते ७ मार्च (३ दिवस) व शहरी भागात ५ ते ९ मार्च (५ दिवस) पर्यंत आयपीपीआयच्या कालावधीत पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.