पिंपरी, (प्रतिनिधी) – सिनेअभिनेता आमिर खान याने सोमवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास भेट दिली. आमिर खान आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे मित्र असून त्यांना भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आला होता.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून राबवला जात असलेल्या दिशा उपक्रमाची माहिती घेत त्या उपक्रमाचे त्याने कौतुक केले. स्वतः आमिर खान आल्याची माहिती समजताच आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी गर्दी केली होती.
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून झोपडपट्टी परिसरातील तरुणांसाठी ‘दिशा’ हा उपक्रम राबवला जात आहे. शिक्षणाचा अभाव, व्यसनाधीनता, वर्चस्ववाद, मोबाईलचा वापर आणि गुन्हेगारीची क्रेझ यामुळे झोपडपट्टी परिसरातील मुले गुन्हेगारीकडे वळली जातात.
त्यांना योग्य वयात योग्य संधी मिळाली तर त्यांच्या हातून चांगले काम होऊ शकेल, अशा विश्वासाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिशा उपक्रम सुरु केला आहे.
पोलिसांनी शहरातील 75 झोपडपट्ट्यांमधून 38 फुटबॉल टीम बनवल्या आहेत. त्यांचा दररोज सराव घेतला जात आहे. स्वतः पोलीस आपला सराव घेत असल्याने मुले देखील या उपक्रमात हिरीरीने सहभागी होत आहेत. अनेक संघांनी विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये बक्षिसे देखील मिळवली आहेत.
पोलिसांकडून राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाला खर्या अर्थाने दिशा मिळत आहे, हे जाणून आमिर खान आणि दिग्दर्शक असलेली किरण राव यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कौतुक केले.