निगडी – व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य, पुणे, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने युवकांसाठी विधायक उपक्रम “दारू नको, दूध प्या’ सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप देताना दारूच्या नशेत नवीन वर्षाचे स्वागत करू नका. युवकांना जाहीर आवाहन करून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करूया. त्यानिमित्त 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला भक्ती-शक्ती शिल्प निगडी या ठिकाणी दूध पिण्याचा दूध वाटण्याचा व भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या ठिकाणी तरुण, लहान मुले तसेच प्रौढ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळेस अनेक मान्यवरांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देत मनोगत व्यक्त केले. भजन, भारूड, व्यसनमुक्तीची माहिती देत अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थितांना दूध वाटप करण्यात आले. या वेळी भक्ती-शक्ती शिल्पाचे पूजन जालिंदर महाराज काळोखे यांनी केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी रंगनाथ उंडे, पुणे गुन्हे शाखा प्रमुख विश्वजीत खुळे, रघुनाथ नायर, राजाभाऊ लोहकरे, विक्रम हिवरे, प्रमोद शिंदे, रमेश माने, गजानन मोरे, अनिल देसाई, भानुदास वैरट, भालचंद्र वडके, मनोहर म्हसे, इंद्रसिंग रजपूत, भरत तुपे, व्यसनमुक्त युवा छावा संघाचे उद्धव वैरट असे साधारण पाचशे पेक्षा अनेक युवक या विधायक उपक्रमास उपस्थित होते.
व्यसनमुक्त शपथ
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, ज्या देशात जन्मलो ती भारत माता व जन्म देणारे माता-पिता यांना स्मरून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून, आम्ही शपथ घेतो की, आपला देश, आपले राज्य, आपला जिल्हा, आपला तालुका, आपले गाव, आपले कुटुंब व्यसनमुक्त राहावे यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. मी स्वतः कधीही दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी निकोटीन युक्त, मादक द्रव्यांचे आणि पदार्थांचे सेवन करणार नाही. मी स्वतः व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त रहावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. असा संकल्प करत शपथ
घेत आहे.