पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात विकास कामे सुरू आहेत. प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याबरोबरच शहर सुशोभीकरण, स्वच्छता, नवीन प्रकल्प, शहरवासियांना आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणी यासह विविध विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केला आहे. तसेच नागरिकांच्या दृष्टीने पालिका विविध सोयी-सुविधा प्रत्यक्ष सुरू करण्यास कटिबद्ध असल्याचेही सिंह यांनी म्हटले आहे.
महापालिकेतील नगरसेवकांचा 12 मार्च 2022 रोजी कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा देणे, प्रलंबित विकास कामे पूर्ण करणे, नवीन प्रकल्प राबविणे याची आयुक्त सिंह यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळेच 2023 मध्ये ही सर्व कामे मार्गी लावण्याचा सिंह यांनी निर्धार केला आहे.
चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून शहराला अतिरिक्त 100 एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, भक्ती-शक्ती ते मुकाई चौक बीआरटीएस रस्ता निर्मिती, बोपखेल येथील पूल निर्मिती, पिंपरी डेअरी फार्म-पूल निर्मिती, स्पाईन रोड मधील मिसिंग लिंक काम पूर्ण करणे, नवी दिशा व शून्य कचरा स्लम प्रकल्प, मुख्य रस्ते यांत्रिकी मशिनद्वारे स्वच्छता काम सुरू करणे, मोशी बायोमायनिंग प्रकल्प तसेच हॉटेल वेस्टपासून गॅस निर्मिती प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अंतर्गत 14 मेगावॅट क्षमता प्रकल्प सुरू करणे, शिक्षणाचा जल्लोष या अभियानाद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देणे, पार्किंग सुविधा वाढ व ट्राफिक समस्येवर उपाययोजना करणे, जिजाऊ क्लिनिकची निर्मिती करणे, मासुळकर नेत्र रुग्णालय सुरू करणे, सर्व रुग्णालयांत दंत रोग विभाग स्थापन करणे, पीएमवाय योजनेद्वारे गोर गरीबांना नागरिकांना घरे उपलब्ध करून देणे, वायसीएममध्ये नर्सिंग कॉलेज सुरू करणे, स्टेट ऑफ आर्ट मध्यवर्ती ग्रंथालय सुरू करणे, यशदाच्या सहकार्याने सुसज्ज युपीएससी, एमपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी सुधार प्रकल्प राबविणे, शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करणे, शहरातील सीसीटीव्ही प्रणाली सुरक्षितता दृष्टीने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्धार आयुक्त सिंह यांनी केला आहे. तसेच आयुक्त सिंह यांनी फक्त निर्धार करून चालणार नाही तर निर्धार केलेली कामे पूर्ण करावीत, असा आशावाद नागरिकांचा आहे.