पिंपरी – शिवार चौक, रहाटणी येथील रेम्बो मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक भिषण आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. यावेळी इमारतीमध्ये तब्बल तीस नागरिक अडकले होते. या नागरिकांची अग्निशामक दलाने अत्यंत प्रयत्नपूर्वक सुटका केल्याने जिवितहानी टळली. आग आणि धुराच्या लोळामुळे संपूर्ण परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेम्बो मॉलला आग लागल्याची वर्दी अजय कोकणे यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या रहाटणी अग्निशामक उपकेंद्राने मुख्य अग्निशामक केंद्रास घटनेचे गांभीर्य सांगितले. त्यानुसार मुख्य अग्निशामक केंद्र, प्राधिकरण, थेरगाव अग्निशाम उपकेंद्र यांच्यासह
बंब घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये 54 मीटर उंच असलेल्या ब्रान्टो गाडीचाही समावेश होता. मॉलमधील दुसऱ्या मजल्यावरील इलक्ट्रिक केबलला आग लागली होती. ही आग पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. इलक्ट्रिक केबलला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत अथक प्रयत्न करत अग्निशामक दलाने ही आग विझविण्यात यश मिळविले. मॉलला आग लागल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ही गर्दी हटविताना पोलिसांची चांगलीच कसरत करावी लागली.
तीन बाजूंनी सुटका
इमारतीला आग लागल्याचे लक्षात येताच नागरिक सुटकेसाठी आरडा-ओरडा करीत होते. येथील बहूतांशी कार्यालयात एसी होते. इमारतीमध्ये धूर पसरला आणि विद्युत पुरवठा खंडीत केल्याने एसी देखील बंद झाले. यामुळे धुरांमुळे अडकलेल्या नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आग्निशामक दलाच्या जवानांनी तीन बाजूंनी नागरिकांची सुटका करण्यास सुरवात केली.
ऑक्सिजन सिलिंडरचा वापर
आगीमुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर तयार झाला होता. यामुळे अग्निशामक दलाला आत जाऊन नागरिकांची सुटका करण्यात अडचणी येत होत्या. तसेच इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांनाही धुराचा त्रास होत असल्याने त्यांचीही सुटका करण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी ऑक्सिजन सिलिंडरचे मास्क लावून इमारतीमध्ये प्रवेश केला. या बचाव कार्याकरिता सुमारे 30 ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करण्यात आला.
ती महिला उडी मारणार होती पण…
मॉलमधील चौथ्या मजल्यावरील एका कार्यालयात अडकलेली महिला सुटका करण्यासाठी खिडकीतून बाहेर आली. आगीमुळे ती प्रचंड घाबरली होती. तिचा रक्तदाबही कमी झाला होता. ती चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या तयारीत होती. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी तिची समजूत काढून सुखरूपरित्या तिची सुटका केली.