पिंपरी – दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असताना शहरातील लाभार्थ्यांना अद्याप आनंदाचा शिधा मिळालेला नाही. शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना मंगळवारअखेर फक्त साखर, मैदा आणि तेल अशा तीनच गोष्टी वितरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शिधामधील सर्व वस्तू तत्काळ उपलब्ध करून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करावे, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निगडी आणि भोसरी असे दोन परिमंडळ येतात. या अंतर्गत शहरात 248 स्वस्त धान्य दुकाने आहेत. निगडी परिमंडळामध्ये 37 हजार 731 तर भोसरी परिमंडळामध्ये 43 हजार 426 असे 81 हजार 157 लाभार्थी आहेत. दिवाळीनिमित्त राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीने अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना गतवर्षीप्रमाणे यंदाही आनंदाचा शिधा 100 रूपयांमध्ये देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल अशा चारच वस्तू होत्या. यामध्ये दोन वस्तूंची भर पडली आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे गोर-गरीब नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे.
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला गुरूवार (दि.9) वसुबारसपासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी धनत्रयोदशी, रविवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आनंदाचा शिधामधील फक्त साखर, मैदा आणि तेल अशा तीनच गोष्टी आल्या आहेत. यामुळे शिधा मिळणार कधी आणि फराळाचे पदार्थ बनविणार कधी हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शिधामध्ये हे मिळणार
आनंदाचा शिधा या संचात 1 किलो साखर, 1 लीटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा देण्यात येणार आहे.
साखर, मैदा आणि तेल अशा तीन वस्तू स्वस्त धान्य दुकानदारांकडे आल्या आहेत. उर्वरित वस्तू आज किंवा उद्या येतील. सर्व वस्तू आल्यानंतर लाभार्थ्यांना तत्काळ त्याचे वितरण करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहेत.
सचिन काळे, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी
भोसरी परिमंडळ अंतर्गत आनंदाचा शिधामधील सर्व वस्तू काही रेशन दुकानदारांकडे आल्या आहेत. त्यांचे वाटप सुरू झाले आहे. तर ज्या दुकानदारांकडे साहित्य आले नाही त्यांना दोन दिवसांत सर्व साहित्य पोहच केले जाईल.
गजानन देशमुख, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, भोसरी