पिंपरी – औद्योगिक आणि व्यावसायिक परिसरामध्ये ध्वनी प्रदूषण घटले असून या उलट निवासी भागांमध्ये वाढले असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालामधून दिसून येत आहे. व्यावसायिक भागात दिवसा ध्वनीपातळी 65 तर रात्री 55 डेसिबल असणे अपेक्षित आहे. ही पातळी 60 च्या आसपास आहे. तर औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 रात्री 70 डेसिबल्स इतकी ध्वनी मर्यादा हवी. परंतु यात चांगली घट झाली असून 60 ते 64 इतकी ध्वनी पातळी आहे. दुसरीकडे निवासी भागांमध्ये दिवसा 55 तर रात्री 45 डेसिबल्स इतकी ध्वनी मर्यादा हवी. मात्र शहरातील विविध निवासी भागांमध्ये ध्वनीची सरासरी पातळी ही 60 ते 67 डेसिबल इतकी आढळून आली आहे
ध्वनी प्रदूषणाचे मानव व पशू-पक्ष्यांच्या आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन भारत सरकारने 2000 साली ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराच्या निवासी भागांमध्ये ध्वनी पातळी ही प्रदूषण मंडळाच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाने तयार केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करणे, नो हॉर्न चे फलक लावणे त्याचबरोबर आवश्यक तेथे नॉइस बॅरियर्ससह आदी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण सद्यःस्थितीचा 2022-23 चा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला आहे. या अहवालात शहरातील विविध भागातील ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या क्षेत्रनिहाय ध्वनी स्तर प्रमाणाची मर्यादा शहरातील विविध भागात ओलांडली आहे. शहरात निवासी क्षेत्रात दिवसा 55 तर रात्री 45 डेसिबल्स इतकी ध्वनी मर्यादा हवी. मात्र शहरातील विविध निवासी भागांमध्ये ध्वनीची सरासरी पातळी ही 60 ते 67 डेसिबल इतकी आढळून आली आहे. त्यामुळे निवासी भागात ध्वनी प्रदूषण वाढले आहे. व्यावसायिक भागात दिवसा ध्वनीपातळी 65 तर रात्री 55 डेसिबल असणे अपेक्षित आहे. ही पातळी 60 च्या आसपास आहे. तर औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 रात्री 70 डेसिबल्स इतकी ध्वनी मर्यादा हवी. मात्र, 60 ते 64 इतकी ध्वनी पातळी आहे. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक भागात ध्वनी प्रदूषण कमी होत असून निवासी भागात मात्र ध्वनी प्रदूषण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण मर्यादेत
शहरात गेल्या तीन वर्षांचा अभ्यास केला तर वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत 1 लाख 7 हजार 46 नवीन वाहनांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाली आहे. यामध्ये ई वाहने आणि सीएनजी वाहनांच प्रमाण वाढले आहे. शहराच्या विविध परिसरातील वायू प्रदूषण तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे हवेतील सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण विहित मर्यादेत आहेत. महापालिका परिसरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन, धूलिकण, कार्बन मोनॉक्साइड हवेतील प्रमाण हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या विहित मर्यादेमध्ये आहे.