2012 मध्ये लावला चोरीचा छडा
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र निमगाव येथील कुलदैवत खंडोबा मंदिरात 14 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली शिवपिंडीवरील 5 किलो चांदी व सव्वा तोळे सोने आज दि. 4 रोजी मंदिराचे पुजारी व विश्वस्तांकडे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सपूर्त केली.
श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात ऐन माघ पोर्णिमेच्या काळात मे 2010 साली दरवाजे तोडून चोरट्यांनी चोरी केली होती. त्यात गाभाऱ्यातील खंडोबा देवासमोर असणाऱ्या शिव पिंडीवरील पाच किलो चांदीचे कवच व सव्वा तोळे वजनाचा सोन्याचा घोडा असा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता.
2012 मध्ये या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश येऊन दोन चोराना अटक केली. मात्र या चोरीतील दोन चोरटे अद्याप फरार आहेत. या चोरीचा खटला खेड न्यायालयात होता त्याचा निकाल सन2015 साली लागला. या निकालात दोन संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या गुन्हातील 5 किलो चांदी, सव्वा तोळे सोने पोलिसांनी चोरट्यांकडून ताब्यात घेतले होते.
दरम्यान ताब्यात घेण्यात आलेला चांदी आणि सोन्याचा ऐवज वितळवण्यात आला. होता. या चांदीच्या ऐवजाच्या छोट्या विटा बनवण्यात सोन्याची लहान लढ बनविण्यात आली.
तब्बल 8 वर्षांनंतर न्यायालयीन आदेशानंतर दि. 4 जुलैला पोलिसांनी मंदिर पुजारी आणि विश्वस्तांच्या ताब्यात हा मुद्देमाल दिला. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस हवालदार संतोष मोरे, सुनील बांडे, संतोष घोलप, सागर शिंगाडे, पुजारी बापूसाहेब भगत, योगेश गुरव, मोहन भगत, दिलीप भगत, हरून पठाण, वैभव गुरव, बाळासाहेब भागुजी भगत, बाळासाहेब भगत आदि उपस्थित होते.