पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्रात श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी 130 पिंजरे असून दिवसाला 15 ते 20 शस्त्रक्रिया होत आहेत. शस्त्रक्रिया वाढविण्याच्या हेतूने आणखी 100 पिंजरे वाढविण्यात येणार आहेत. तसेच गेल्या दहा महिन्यांत पालिका, कॅनन कंट्रोल ऍण्ड केअर आणि पीपल्स फॉर ऍनिमल्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अडीच हजार श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत शहरात सुमारे 90 हजार भटके श्वान असल्याचे पशू वैद्यकीय विभागाचा अंदाज आहे. भटके श्वानांची संख्या आटोक्यात रहावी, यासाठी श्वान संतती नियमन शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने मादी श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला आहे. ऑगस्ट 2022 पासून कॅनन कंट्रोल ऍण्ड केअर आणि पीपल्स फॉर ऍनिमल्स संस्था (पीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने 2 हजार 499 श्वानांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेच्या युनिटमध्ये 130 पिंजरे आहेत. पिंजऱ्यांची संख्या 130 इतकी झाली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी आणखी किमान 100 पिंजरे गरजेचे आहेत. प्रतिदिन 50 नसबंदी शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. यासाठी आणखी 100 पिंजरे तयार केले जाणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे पशू वैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.
नेहरूनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्र एकात्मिक प्राणी नियोजन केंद्रात भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. श्वान उपचार केंद्र, श्वान निर्बीजीकरण केंद्र, लहान प्राणी दहन मशीन, फिरती रुग्णवाहिका उपलब्ध आहे.