TDS Scam – तब्बल 263 कोटी रुपयांच्या प्राप्ति कर टीडीएस परतावा घोटाळ्यात ईडीने कारवाई केली. घोटाळ्या प्रकरणी पीएमएलए कायदा 2002 च्या तरतुदींअंतर्गत पुरुषोत्तम चव्हाण नामक एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 27 मे पर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने 263 कोटी रुपयांच्या प्राप्ति कर परतावा घोटाळा प्रकरणात पुरुषोत्तम चव्हाण याला सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. कोठडी सुनावण्यात आलेल्या पुरुषोत्तम चव्हाणकडे गुन्ह्यातील काही रक्कम होती, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
काय आहे प्रकरण?
आयकर रिटर्न घोटाळा प्रकरणी ईडीने गेल्या वर्षी माजी प्राप्तिकर (आयटी) अधिकारी तानाजी मंडल अधिकाऱ्यांना अटक केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, आयकर विभागाच्या मुंबई कार्यालयात असताना त्यांनी 263 कोटी रुपयांचा बनावट टीडीएस परतावा तयार केला. या प्रकरणात यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यात तानाजी अधिकारी, भूषण पाटील आणि राजेश शेट्टी हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत तर राजेश ब्रिजलाल बत्रेजा हे ईडी कोठडीत आहेत. पाटील, शेट्टी आणि बत्रेजा हे तानाजी अधिकाऱ्यांचे सहकारी आहेत. याच घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार पुरुषोत्तम चव्हाणला अटक करण्यात आली.
त्याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 मे पर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले. या घोटाळ्यातील पुरुषोत्तम चव्हाण यांच्या भूमिकेबाबत सांगताना ईडी अधिकारी म्हणाले की, सध्या ईडी कोठडीत असलेला बत्रेजा आणि चव्हाण नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच हवाला व्यवहार आणि गुन्ह्यातील रक्कम वळवण्याशी संबंधित माहिती एकमेकांना देत होते.
चव्हाण यांना अटक करण्यापूर्वी ईडीने रविवारी त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. यावेळी मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे, विदेशी चलन आणि मोबाइल जप्त करण्यात आले. मात्र, चव्हाण यांनी पुरावे नष्ट करून तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा ईडीचा आरोप आहे. मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत ईडीने यापूर्वीच महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आरोपींच्या कोट्यवधींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.